चंद्रपुरमध्ये दारूचा महापूर, महिन्याभरातील आकडेवारी थक्क करणारी

दारूबंदी उठल्यानंतर जिल्ह्यात गँगवॉर, घरफोड्या आणि हत्यांसारख्या गुन्ह्यांमध्येही झाली आहे वाढ

Updated: Aug 13, 2021, 10:08 PM IST
चंद्रपुरमध्ये दारूचा महापूर, महिन्याभरातील आकडेवारी थक्क करणारी title=

आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मात्र, महाविकास आघाडी सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला. अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचा दावा सरकारने निर्णय घेताना केला.

पण दारुबंदी उठल्यानंतर गेल्या महिन्याभरात विकल्या गेलेल्या दारूचा आकडा थक्क करणारा आहे. दारूबंदी उठल्यानंतर महिन्याभरात चंद्रपूरकरांनी दारूनं आंघोळ केलीये की काय, असं वाटण्यासारखी ही स्थिती आहे. या काळात तब्बल 60 कोटी रुपयांची दारू चंद्रपूरकरांनी रिचवली आहे. दारूबंदीच्या काळातही चोरट्या मार्गानं विक्री होत असली, तरी ही आकडेवारी थक्क करणारी आहे. 

यामध्ये 8,02,105 लिटर देशी दारु, 2,12,552 लिटर विदेशी दारू, 2,07,769 लिटर बिअर आणि 1,964 लिटर वाईनचा खप झाला आहे.

दारूबंदी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केलीये. दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे घरगुती हिंसाचारांमध्ये वाढ होण्याची भीती महिलांनी बोलून दाखवली आहे.

दारूबंदी उठल्यानंतर जिल्ह्यात गँगवॉर, घरफोड्या आणि हत्यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचंही दिसत आहे. दारूविक्रीतून सरकारला मोठा महसूल मिळत असला, तरी त्यामुळे कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.