निलंबित 'गोंधळी' नगरसेवकांना पोलिसांनी काढलं सभागृहाबाहेर

गोंधळ परंपरेसाठी कुख्यात अकोला महापालिकेच्या सोमवारच्या सभेतही प्रचंड गोंधळ झाला.

Updated: May 30, 2017, 10:13 AM IST
निलंबित 'गोंधळी' नगरसेवकांना पोलिसांनी काढलं सभागृहाबाहेर title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : गोंधळ परंपरेसाठी कुख्यात अकोला महापालिकेच्या सोमवारच्या सभेतही प्रचंड गोंधळ झाला.

करवाढीच्या मुद्द्यावर गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाला महापौरांनी एक दिवसासाठी निलंबित केलंय. यानंतर सभागृहात खुर्च्या आणि माईकची प्रचंड फेकाफेक करण्यात आलीय. निलंबित तिन्ही नगरसेवकांना पोलिसांनी सभागृहातून बाहेर काढलं.

गोंधळ, तोडफोड आणि हाणामारी... हीच आता अकोला महापालिकेची ओळख बनलीय. अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा म्हणजे राजकीय आखाडाच... सोमवारी झालेली महापालिकेची सर्वसाधारण सभाही याला अपवाद नव्हती. अकोला महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. आजच्या सभेत करवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस, शिवसेना आणि भारिपनं सभागृहात प्रचंड गोंधळ घातला.
 
शिवसेना नगरसेवकांनी करवाढीला विरोध करणारे कपडे घालून आणि फलक फडकवतच सभागृहात प्रवेश केला. यानंतर सभागृहात करवाढीच्या मुद्द्यावर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यानंतर, महापौर विजय अग्रवाल यांनी गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाला एका दिवसासाठी निलंबित केलं.

निलंबित नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण यांचा समावेश आहे. निलंबित तिन्ही नगरसेवकांना सभागृहातून बाहेर काढण्यासाठी महापौरांनी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी या 'गोंधळी' नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढलं. यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. यानंतर सभागृहात खुर्च्या आणि माईकची प्रचंड फेकाफेक करण्यात आली.