अजित पवारांनी शिवसेनेचा 'बाप' काढला

राज्यात दुष्काळामुळं शेतकऱ्यांचं जगणं असह्य झालं असताना, राजकीय नेते मात्र एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात गुंग आहेत.

Updated: Oct 24, 2018, 06:24 PM IST
अजित पवारांनी शिवसेनेचा 'बाप' काढला title=

जालना : राज्यात दुष्काळामुळं शेतकऱ्यांचं जगणं असह्य झालं असताना, राजकीय नेते मात्र एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात गुंग आहेत. सध्या दुष्काळी  दौऱ्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना चिमटा काढला. राज्यातली धरणं भरली नसली तरी तुम्ही धरणाच्या आसपासही फिरकू नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी त्यांची फिरकी घेतली.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला अजित पवारांनी राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून खिजवलं. ज्यांना बापाचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर बांधायला निघालेत, असा टोला त्यांनी हाणला. यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा अजित पवार यांना प्रतीप्रश्न केला आहे. राफेल विमानांना काकांचा पाठिंबा आहे का ते विचारून घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

याआधी सांगलीमध्येही अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. फक्त विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जाता येत नसल्याने हे अयोध्येला निघाले आहेत तेथे जाऊन काय दिवे लावणार आहे असं अजित पवार म्हणाले होते.

युती सरकारचे मंत्री बावचळून गेले आहेत. यांनी घरपोच दारू द्यायचा निर्णय घेतला आहे. यांच्या बापाने घरपोच दारू दिली होती का, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजित पवारांनी राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचाही देखील खरपूस समाचार घेतला. पोरी काय यांच्या बापाचा आहेत का? असा प्रश्न देखील विचारला.