माझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रिया

Pune Nashik Highway Manchar Accident: अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 23, 2024, 11:40 AM IST
माझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रिया title=
Ajit Pawar Group MLA DILIP MOHITE reaction over his nephew Involved in Fatal Accident

Pune Nashik Highway Manchar Accident: पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या आमदाराचा पुतण्याचे नाव समोर येत आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांच्या पुतण्या मयुर मोहितेच्या फॉर्च्युनर काराने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता आमदारांनीच या अपघाताबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी हा अपघात घडला होता. एका भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात 19 वर्षीय दुचाकीस्वाराला जागीच मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, मयुर मोहिते हा कार विरुद्ध दिशेने चालवत होता. त्याचवेळी त्याच्या कारने दुचाकीला धडत दिल्याने दुचाकीस्वार काही फूट अंतरावर फेकला गेला. धक्कादायक म्हणजे, अपघातानंतर जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी मयुर मोहिते कारमध्येच बसून असल्याचे कॅमेऱ्यात कैद झालं आहे. आता या सगळ्या प्रकरणावर दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

शनिवारी रात्री जो अपघात झाला. अपघातानंतर जेव्हा मला फोन आला तेव्हा मी स्वतःहून माझ्या पुतण्याला पोलिस स्टेशनला हजर राहायला सांगितलं. पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. या सगळ्याची चौकशी पोलिस करत आहेत. जोपर्यंत यात दोषी कोण याचा तपास होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. माझा सख्खा पुतण्या जरी असला आणि त्याने चुक केली असली तर जे काही कायद्याचे भाषेत होईल ते झालं तरी मी त्यामध्ये कोणताही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, असं आमदार मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे. 

माझ्या पुतण्याने स्वतः त्याला उचलून रुग्णवाहिकेत ठेवलं आहे. मी त्या ठिकाणी नव्हतो. मी पोलिसांकडून माहिती घेतो. पण माझा पोलिसांच्या तपासात कोणताही हस्तक्षेप नाहीये. जोपर्यंत याचा तपास लागत नाही तोपर्यंत पोलिसही काही सांगू शकत नाही. मयत आणि माझा पुतण्या दोघांची मेडिकल झाली आहे. त्या दोघांचेही मेडिकल रिपोर्ट यायचे आहेत. ते आल्यानंतरच पोलिस सांगू शकतील, असं दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.