अधिवेशन सुरु असतानाच एनडीएचं संख्याबळ 284 वरुन 300 च्या पुढे जाईल असा मोठा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. तसंच 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य असतील असंही म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन असून यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांनी पक्षाला दिलेल्या सामर्थ्यशाली नेतृत्वासाठी कृतज्ञता व्यक्त करत आभारही मानले.
"नव्या उमेदीने आपल्या सर्वांना काम करायचं आहे. देशाची राजकीय स्थिती नेहमी बदलत असते. लोकसभा निवडणुकीत अनेकांचे अंदाज चुकले. अनेकजण काहीतरी सांगत होते. काय निकाल लागेल हे ब्रह्मदेवालाच माहिती असं मी म्हणालो होतो. आपण प्रयत्न केले," असं अजित पवारांनी सांगितलं.
"पहिल्याच बैठकीत नरेंद्र मोदींनी मी सर्व घटकपक्षांनी वेळ देऊ शकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनी स्वतंत्र कराभार आणि राज्यमंत्रीपद देण्याबाबत सांगितलं होतं. 1 जुलै किंवा 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य पाहायला मिळतील. आम्ही प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुचवलं होतं. त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद हाताळलं असल्याने स्वतंत्र कारभार पाहणं आम्हाला पटत नसल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांनाही स्वतंत्र कारभार दिल्याचं ते म्हणाले. त्यावर आम्ही जर तुम्हाला जमत नसेल तर पद स्विकारणार नाही असं सांगितलं. आम्ही एनडीएच्या पाठीशीच राहू. पण त्याचा विपर्यास करत चुकीच्या बातम्या देण्यात आल्या," असा दावा अजित पवारांनी केला आहे.
"जेव्हा असे निर्णय होतात तेव्हा तो एकत्रितपणे घेतला जातो. पक्षाला बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी कोणतीही विश्वासार्हता कमी होणार नाही याची काळजी घ्या. पक्षाला अपेक्षित यश मिळालेलं नसलं तरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड मतदारसंघात विजय मिळणं अभिमानाची बाब आहे. अरुणाचल प्रदेशातही आमदार निवडून आले ही चांगली बाब आहे. तटकरेंना तुम्ही पक्षाची लाज राखली असं म्हटलं. मी त्यांचं अभिनंदन कतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो," असं अजित पवार म्हणाले.
"अर्थसंकल्प सादर करेपर्यंत मी 4 दिवस मुंबईत थांबणार आहे. नंतर पक्षासाठी वेळ देणार आहे. आपण संपूर्ण महरााष्ट्र ढवळून काढू. पक्षाच्या कार्यालयात ठराविक लोकांनी बसलं पाहिजे. दर आठवड्याला सेल प्रमुखांनी आढावा घेतला पाहिजे. मंत्र्यांचीही ही जबाबदारी आहे. ज्या गोष्टी नजरचुकीने राहिल्या आहेत त्या दुरुस्त करु," असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.
"आपण महायुतीत असलो तरी शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. हे मी मित्रपक्षांनाही स्पष्ट सांगितलं आहे. विरोधक चुकीच्या पद्दतीने नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. चंद्र-सूर्य असेपर्यंत संविधान कोणी बदलू शकणार नाही असं मी सांगितलं होतं. पण आपण जे सांगत होतो ते मागासवर्गीयांनी समजावण्यात अपयशी ठरलो. पण विरोधक त्यात यशस्वी झाले," अशी सल अजित पवारांनी बोलून दाखवली.
"हे सरकार 5 वर्षं टिकवायचं आहे. समोरचे लोक पुन्हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतील. अधिवेशनानंतर 284 चा आकडा 300 च्या पुढे जाईल हे तुम्ही पाहा. सीएएए संदर्भातही खोटं सांगण्यात आलं. वाटेल ते खोटं रेटून बोलत आहेत," असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला आहे. पराभवाची जबाबदारी मी स्विकारील असून, मला इतर कोणावर ढकलायचं नाही. जे घटक दूर गेले आहेत त्यांना पुन्हा जोढम्याचं काम करायचं आहे असंही ते म्हणाले.