अजित पवारांकडे सोपवण्यात आली मोठी जबाबदारी! चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी

Political News Ajit Pawar: मे महिन्यामध्ये अजित पवारांसहीत राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून सुरु असलेला तिढा सुटला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 4, 2023, 03:10 PM IST
अजित पवारांकडे सोपवण्यात आली मोठी जबाबदारी! चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी title=
मे महिन्यापासून सुरु असलेला तिढा सुटला

Political News Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून सुरु असलेला पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. तर पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना सोलापूर, अमरावतीचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. हा निर्णय एक प्रकारे अजित पवार यांचं मोठं राजकीय यश मानलं जात आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदाचाही झाला निर्णय

पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर 4 महिन्यांनी सुटला आहे. ही फार महत्त्वाची राजकीय घडामोड असल्याचं सांगितलं जात आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुनही वाद सुरु असल्याने सध्या तात्पुरत्या स्वरुपात या जिल्ह्याची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना विरोध असल्याने सध्या तरी या मतदारसंघासंदर्भात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

विदर्भामध्ये पालकमंत्री कोण?

विदर्भामध्ये बहुतेक जिल्ह्यांचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मात्र आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर, अमरावतीचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. तर विजयकुमार गावित यांच्याकडे भंडारा, धर्मराव आत्राम यांच्याकडे गोंदियाचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. विद्यमान मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यात ज्या बीड जिल्ह्यावरुन शीतयुद्ध सुरु असून या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेकडेच सोपवण्यात आलं आहे. पालमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद असून या नेत्यांमध्ये असणारा असंतोष शांत करण्याचा प्रयत्न या मंत्रीपदाच्या वाटपामधून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

राधाकृष्ण विखे-पाटलांकडून एक जिल्हा काढून 2 जिल्हे देण्यात आले

संजय बनसोडे यांच्या परभणीचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. अनिल पाटील यांच्याकडे नंदूरबार जिल्हा देण्यात आला आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून सोलापूरची जबाबदारी काढून त्यांच्याकडे अकोला आणि नगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. जिल्ह्यातील स्थानिक विरोध कमी करण्याचा प्रयत्न या नियुक्तीमधून दिसून येत आहे.

शिंदेंनी वापरलं स्वत:चं राजकीय वजन

नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलेलं नाही. हे पद सध्या दादा भुसे यांच्याकडेच ठेवण्यात आलं आहे. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांच्याकडे देऊन थोडीशी नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्री न बदलून शिंदेंनी स्वत:चं राजकीय वजन वापरल्याचं दिसून येत आहे.