'भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न'

अहमदनगर महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी केला गौप्यस्फोट

Updated: Jan 2, 2019, 08:37 AM IST
'भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न' title=

अहमदनगर : अहमदनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी सर्व भाजप विरोधात असलेल्या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न शिवसेना करत होती असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. नगर महापौर निवडणुकीबाबत मी स्वतः अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं 'खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' असल्याचं दाखवून दिल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर नगर महापौर निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यांची युती असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं कदम यांनी सांगितलं.

कोण खोटं बोलतंय?

धक्कादायक म्हणजे, अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानासाठी शिवसेना नेत्यांनीच आपल्याला फोन केला होता त्यामुळेच आपण महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याचा दावा श्रीपाद छिंदम यांनी केला होता. यासाठी त्यांनी एका फोन कॉलचं रेकॉर्डींगही जाहीर केलं होतं. मात्र, छिंदम यांचा हा दावा फेटाळून लावतानाच महापालिकेत मतदानानंतर शिवसेनेनं 'शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याकडून आम्हाला मत नको' असं सांगतं एकच गोंधळ घातला. इतकंच नाही तर, शिवसैनिक छिंदम यांच्या अंगावर धावूनही गेले होते. तर यावर हा शिवसेनेचा स्टंट असल्याचं छिंदम यांनी म्हटलं होतं.

अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच भाजपचा झेंडा

दरम्यान, अहमदनगर येथे महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापौर पदाची तर मालनताई ढोणे यांनी उपमहापौर पदाची सूत्र हाती घेतली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापौर दालनात खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खुर्चीची विधीवत पूजा करून पदभार घेतला. भाजपने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून आपला महापौर आणि उपमहापौर पालिकेत बसवण्यात यश मिळवलं. उल्लेखनीय म्हणजे, अहमदनगरमध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यापासून प्रथमच भाजपचा झेंडा महानगरपालिकेवर फडकला आहे.