नितीन आगे हत्या प्रकरण : सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुटुंबीयांना मोठा धक्का

जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा इथल्या नितीन आगे हत्या प्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केलीये. सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका झाल्याने नितीनच्या कुटुंबीयांना धक्का बसलाय.

Updated: Nov 24, 2017, 11:32 PM IST
नितीन आगे हत्या प्रकरण : सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुटुंबीयांना मोठा धक्का title=

अहमदनगर : जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा इथल्या नितीन आगे हत्या प्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केलीये. सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका झाल्याने नितीनच्या कुटुंबीयांना धक्का बसलाय.

प्रेमप्रकरणातून हत्या

जामखेड तालुक्यातील खर्डा इथं २८ एप्रिल 2014 रोजी नितीन आगेची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन गोलेकरसह 13 आरोपींना अटक केली. मात्र यातील 3 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. तर 1 आरोपी जामिनावर सुटका झाली. 

त्यामुळे उर्वरीत 9 आरोपींविरोधात अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला सुरु होता. या खटल्यात 26 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र सबळ पुराव्याअभावी  सर्व आरोपींची निर्दोष सुटका झालीय.

नितीनच्या कुटुंबीयांना धक्का 

या निकालामुळे नितीन आगेच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला. पोलिसांच्या तपासात त्रुटी असल्याने आरोपी निर्दोष सुटल्याचा आरोप नितीन आगेच्या वडीलांनी केलाय. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असून न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा नितीनच्या नातेवाईकांनी केलाय. 

नितीन आगे हत्या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. तर नितीनच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोवर लढा सुरु ठेवण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिलाय.

साडेतीन वर्षांनंतर हत्या प्रकरणाचा निकाल

तब्बल साडेतीन वर्षांनंतर नितीन आगे हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय. त्यातही आरोपींची निर्दोष मुक्तता झालीय. निकालावर नितीनचे कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे आता उच्च न्यायालयात तरी नितीनच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल का याकडं नजरा लागल्यात