ठाणे : घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड तुर्फेपाडा येथील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्याना आग लागून तीन सिलिंडरचे स्फोट झालेत. त्यानंतर आग अधिकच भडकली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या आगीत पत्र्याच्या अंदाजे २२ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी ठाणे महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसली तरी दोन मांजरे होरपळून मरण पावलीत.
घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज - २ चे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर अनेकांनी पत्र्याची बेकायदा घरे उभारली आहेत. या झोपडपट्टीला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने झोपड्यामधील तीन सिलिंडरचा स्फोट होऊन गोरगरिबांचे सर्व संसार खाक झाले.
सुदैवाने,या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी आगीत होरपळून दोन मांजरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान,शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या या झोपड्यावर एक-दोन दिवसात कारवाई केली जाणार होती. यासाठी ठाणे महापालिकेने या झोपड्यांना नोटीस बजावल्या होत्या, अशी माहिती आपत्कालीन कक्ष यांच्याकडून देण्यात आली.