Beed Loksabha Election 2024 Result : बीड मतदार संघात राज्यातील सर्वात महाव्होल्ट्ज लढत झाली. बीडमध्ये राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल लागला आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा दारुण परभाव झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना परभवाची धूळ चारली. बजरंग सोनवणे यांनी 6हजार585 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बीडमधील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय घेतला आहे.
गेली 15 वर्षं बीड भाजपचा गड आहे. यंदा भाजपने प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंनी खासदार प्रीतम मुंडेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रीतम मुंडे यांनी 1 लाख 68 हजार मतांनी बजरंग सोनवणेंचा पराभव केला होता. पंकजा मुंडे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणे यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावरुन बजरंग सोनवणे यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.
लोकसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले. अथक परिश्रम घेतले. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता काम केले त्या सर्वाचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मनापासुन आभार मानले आहेत. पुढील आठवड्यात म्हणजे 12 किंवा 15 तारखेपासून आपण पूर्ण जिल्हाभरात आभार दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सर्वच्या सर्व 11 तालुक्यात जावून मतदारांची भेट घेऊन त्यांचे आभार मानणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात सोशल मिडियावर एका व्हिडिओ संदेशाद्वारे पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत मतदारांचे आभार मानले आहेत. माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील समस्त कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले, प्रार्थना केल्या, माझ्यासाठी नवस बोलले, माझ्या यशाची कामना केली त्याबद्दल सर्वांचे आभार. त्या ६ लाख ७७ हजार मतदारांचेही मनापासुन आभार ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मला मतदान केले असं पंकजा मुंडे म्हणाल्या. या देशामध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेली जागा बीडची असेल आणि सर्वात कमी मतांनी पडलेली पहिल्या अथवा दुसऱ्या नंबरची माझी जागा असेल, म्हणजे इतकी टफ फाईट अत्यंत विपरित परिस्थितीत मी देऊ शकले ते केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर.
पुन्हा जनसंपर्क वाढवण्याचा निर्णय पंकडा मुंडे यांनी जाहीर केला आहे. पक्षाच्या बैठका असल्याने मी मुंबई, दिल्लीला जाईल, त्यानंतर मी 12 किंवा 15 तारखेपासून आभार दौरा करणार आहे. तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे. तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी. संघर्ष हा आपल्या जीवनात पाचवीला पूजला आहे. या संघर्षात न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मला खूप खूप अभिमान वाटतो असंही पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.