Lok Sabha Election 2024 : माढा आणि अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागलीय. पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. काकडे यांनी थेट फेसबूकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काकडे नाराज असल्यामुळेच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत आपल्या वेदना आणि पुणे लोकसभेचं वास्तव चव्हाणांसमोर मांडल्याचं काकडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्या भावना पोहचवण्याचं आश्वासन चव्हाणांनी दिल्याचं काकडेंनी सांगितलं.
राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माझे मित्र माननीय श्री रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली.
यावेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तराने सांगितले. तसेच, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली.
मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक व केंद्रीय गृहमंत्री आदरणीय श्री अमितभाई शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटी दरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे.
अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणांना उमेदवारी दिलीय.. आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत. भाजपनं आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीत नवनीत राणांचं नाव आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्या रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळं अमरावतीमधील उमेदवाराबाबतचा सस्पेन्स संपलाय. मात्र महायुतीतला तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. बच्चू कडूंनी नवनीत राणांना आशीर्वाद द्यावा, अशी हात जोडून विनंती रवी राणा यांनी केलीय. त्यामुळे आता बच्चू कडू नवनीत राणा यांचा प्रचार करणार का याकडे लक्ष लागले आहे.