प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मुलांच्या शालेय परीक्षा संपल्यात आणि सुट्टी (Holiday) सुरु झाली आहे. सकाळपासूनच मुलं घराबाहेर पडून खेळण्यात दंग होतात. तहानभूक विसरून मुलं वेगवेगळे खेळ खेळत असतात. इमारतीच्या आवारातच खेळत असल्याने पालकही निर्धास्त असतात. पण मुलांना खेळण्यासाठी पाठवताना त्यांच्यावर लक्ष ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विरारमध्ये (Virar) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय आहे नेमकी घटना?
विरार पश्चिमेला असलेल्या HDIL कॉम्प्लेक्स मध्ये सायकल चालवत असताना 9 वर्षाच्या मुलाचा अपघात (9 Year Old Boy Accident) झाला. इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये काही मुलं सायकल चालवत होती. यात अपघातग्रस्त मुलगाही त्यांच्याबरोबर सायकल चालवत होता. सालकल चालवताना इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये असलेल्या छोट्याशा डिव्हायरडरवरून त्याने सायकल उडवली. पण त्याचवेळी त्याच्या सायकलचं हँडल अचानक तुटलं आणि तो मुलगा जमिनीवर कोसळला.
हा सर्व प्रकार इमारतीमध्ये लागलेल्या सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. हा मुलगा सायकल वरून पडल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध अवस्थेत गेला होता. इमारतीतील काही नागरिकांनी तात्काळ जवळील रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केलं. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्या मुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन बहिणीचा खून
दरम्यान, उल्हासनगमध्ये एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या चारित्र्यावर संशय (Doubts on character) घेऊन तिच्या सख्ख्या भावाने सलग चार दिवस तिला लाथा बुक्क्यांनी, स्टीलच्या पकडीने तोंडावर ,पाठीवर आणि शरीराच्या इतर ठिकाणी बेदम मारहाण केली. या मारहाणीत 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीला मासिक पाळीमुळे रक्तस्त्राव होत होता. रक्तस्त्राव का होतोय असं भावाने तिला विचारलं, पण अल्पवयीन मुलीला त्यावर उत्तर देता आलं नाही. त्यामुळ भाऊ ब्रिजेश शुक्लाने तिच्या चारित्र्यावर संशल घेत तिला बेदम मारहाण केली.
सलग चार दिवस तिला मारहाण केल्याने तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याने तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचाराआधीच मृत्यू झाला होता .याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी ब्रिजेशला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे. मात्र गैरसमजुतीतून आज त्या अल्पवयीन मुलीला जीव गमवावा लागला , या हत्येने उल्हासनगर शहर हादरलं असून निर्दयी भावाबद्दल संताप व्यक्त केला जातोय