लातूर एसीबीच्या डीवायएसपींवरच लाच स्वीकारल्याचा गंभीर आरोप

लाच घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारीच लाच घेताना जाळ्यात सापडला आहे. 

Updated: Aug 12, 2017, 08:14 PM IST
लातूर एसीबीच्या डीवायएसपींवरच लाच स्वीकारल्याचा गंभीर आरोप title=

लातूर : लाच घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारीच लाच घेताना जाळ्यात सापडला आहे. लातूरच्या एसीबीचे डीवायएसपी सुरेश शेटकर यांनी आरटीओ कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे एका प्रकरणात कारवाई न करण्यासठी लाचेची मागणी केली होती. यावरून त्या आरटीओ अधिकाऱ्याने याची तक्रार थेट मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यावरून मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या एका पथकाने सापळा रचला. 

लातूर शहरातील औसा रोडवरील दत्तकृपा ड्रायव्हिंग स्कुलमध्ये काल रात्री हा सापळा रचला. यावेळी या पथकाने ज्यात दत्तकृपा ड्रायव्हिंग स्कुलचा मालक विजय उर्फ छोटू गडकरी याला ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. डीवायएसपी सुरेश शेटकर यांचा हस्तक म्हणून छोटू गडकरी हा लाच स्वीकारत असल्यामुळे मुंबईच्या लाचपुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. तर डीवायएसपी सुरेश शेटकर हे आऊट ऑफ रिच झाले असून ते अजून मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडले नाहीत. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सुरेश शेटकर आणि थेट लाच स्वीकारणारा हस्तक छोटू गडकरी यांच्याविरोधात लातूर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाचा मोठा अधिकारीच लाच घेताना जाळ्यात सापडल्याची राज्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जातेय.