प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : छंद... मनुष्य प्राण्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक... या छंदापायी छंदिष्ट काय काय करतील, याचा नेमच नाही... अभिषेक अशोक नार्वेकर असाच एक अवलिया छंदिष्ट...
जेम-तेम सत्तावीस वर्षांचा हा तरूण... आपल्या सायकलिंगच्या छंदापासून ट्रॅव्हल्स कंपनीत असलेली नोकरी सोडणारा... आणि आपण देशासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून सायकलिंग करत, स्वच्छ भारताचा संदेश देत अख्या भारतभर फिरणारा तरूण सध्या देशाच्या कोस्टल मार्गावरून भारताची परिक्रमा पूर्ण करण्यास निघालाय. गुजरातमधून त्याने त्याच्या या प्रवासाला सुरूवात केलीय.
अभिषेक नार्वेकर... सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीत राहणारा सायकलवीर... देशाच्या कोस्टल भागातून तब्बल आठ हजार किलोमीटरची परिक्रमा करण्यासाठी तो निघालाय. स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी तसंच समुद्रकिनाऱ्या शेजारच्या हायवेवरील दुर्लक्षित गावं माहिती करुन घेण्यासाठी हा अवलिया सध्या प्रवास करतोय.
दररोज १०० किलोमीटरचा प्रवास करण्याचा अभिषेकचा संकल्प आहे. आत्तापर्यंत त्यानं
२५०० किलोमीटर प्रवास केलाय. भल्या पहाटे प्रवासाला सुरुवात करायची... वाटेत भेटेल त्या ठिकाणी रहायचं, जेवायचं, तिथली संस्कृती समजून घ्यायची आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागायचं असा त्याचा दररोजचा दिनक्रम आहे. याआधीही अभिषेकनं मनाली ते श्रीनगरपर्यंतचा प्रवास सायकलनंच केलाय.
पाकिस्तानच्या बॉर्डरपासून लखपतपासून हा प्रवास सुरू झालाय. त्याचा पहिला टप्पा कन्याकुमारी पर्यंतचा आहे... आणि त्यानंतर बांग्लादेशच्या सुंदरबनजवळ बखारी इथं प्रवासाची सांगता होणार आहे. अभिषेकला त्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा...