मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriay Sule) यांच्यावर टीका करताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक होत अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.
"राजकारणातल्या माता भगिनींना पुन्हा शिव्या देण्याचे पाप अब्दुल सत्तार यांनी केले आहे. आपली तेवढी लायकी आहे का? तुम्ही जे जाणून बुजून बोलता हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. अब्दुल सत्तार यापुढे आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही," असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करत अब्दुल सत्तार यांना इशार दिलाय. "अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलु शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही .आदरणीय सुप्रियाताई बद्दल वापरलेले अप शब्द 24 तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या .नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल," असे अमोल मिटकरी म्हणाले.
"मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. आमच्यामध्ये भांडण लावू नका. मी कोणत्याही महिलेला बोललो नाही. कोणत्याही महिलेचे मन दुखले असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. पण जर आमच्याबद्दल कोणी कुणीतरी खोके नावाचा आरोप लावत असेल त्यांच्याबद्दल मी जे काही बोललो ती आमच्याकडील ग्रामीण भाषा आहे. महिलांच्या बद्दल मी एक शब्दही बोललो नाही," असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद मुंबईतही पाहायला मिळाले. अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धडक देत तोडफोड केली. याबाबतही अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले. "बंगल्याच्या काचा कोणी फोडल्या तर मला भीती वाटत नाही. मी पुन्हा सांगतोय की महिलांच्या बद्दल अपशब्द वापरला नाही. कोणाच्याही भावना दुखावणारे शब्द बोललो नाही. देशातील किंवा महाराष्ट्रातील महिलांची मने दुखली असतील तर मी सॉरी म्हणतो," असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथं खासदार एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेची सर्व तयारी अब्दुल सत्तार बघत आहेत. यावेळी अब्दुल सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना सत्तार यांची जीभ घसरली. सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करत 'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. जे आम्हाला खोके बोलतात त्यांच्या डोक्यात खोके भरले असल्याची टीकाही सत्तार यांनी केली आहे.