Aadhaar cards found in Panchganga : प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर / पंचगंगा नदीत आढळलेल्या आधारकार्डांबाबत (Aadhaar cards) धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Kolhapur) या आधार कार्डचा पेन्शन योजनेसाठी गैरवापर झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.. सापडलेल्या आधार कार्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कार्डची संख्या अधिक असल्यानं संशय बळावलाय. तलाठी कार्यालयाकडून सापडलेल्या सर्व आधार कार्डची तपासणी केली जाणार आहे. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इचलकरंजीत पंचगंगा पात्रात पोतंभर आधारकार्ड मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आधार कार्ड कुणाची याचा शोध पोलीस घेत आहेत. कोल्हापूरकरांनो तुमची आधारकार्ड सुरक्षित आहेत की नाही हे तपासा कारण पंचगंगा नदीपात्रात पोतंभरुन आधारकार्ड मिळालीयत. काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रेशन कार्ड आढळून आली होती, त्यानंतर आता हजारो आधारकार्ड सापडल्यानं चिंता व्यक्त केलीय जात आहे. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना एक पोतं तरंगताना दिसलं. हे पोतं बाहेर काढल्यावर हजारो आधारकार्ड त्यात सापडली.
- शासकीय योजनांसाठी आधारकार्ड महत्वाचा दस्तावेज आहे
- पंचगंगा पात्रात सापडलेल्या आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचं वय साधारण 60 ते 65 आहे.
- पोलिसांच्या प्राथमिक तपासात सापडलेली सर्व आधार कार्ड इचलकरंजी शहर आणि परिसरातील असल्याचे समजतंय
- आधार कार्ड बाहेर काढल्यानंतर सर्व ओरिजिनल असल्याचे समजतंय.
- इचलकरंजी शहरासह जवाहरनगर, कोरोची, कबनूर भागातील आहेत.
- आधार कार्डवरुन काहींना संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी ती आपल्याकडेच सांगितलं. त्यामुळे हजारो बोगस आधार कार्ड छापली गेल्याचा संशय पोलिसांना आहे.
सापडलेली सर्वच्या सर्व आधार कार्ड ही बोगस आहेत की, कुणी जाणीवपूर्वक पंचगंगा नदी पात्रात टाकलीयत याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र त्यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डवर वय वाढवण्याचे प्रकार सुरु आहेत, त्यासाठी हा प्रकार सुरु आहे का? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोगस आधारकार्डांची छपाई सुरु आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.