लडकी का चक्कर बाबू भय्या! मुलगी पटत नाही म्हणून आमदाराला पत्र

तरुणाचे हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. 

Updated: Sep 13, 2021, 10:40 PM IST
लडकी का चक्कर बाबू भय्या! मुलगी पटत नाही म्हणून आमदाराला पत्र title=

आशीष अम्बाडे, झी २४ तास, चंद्रपूर : प्रेमात माणूस आंधळा होता. प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असतो. काही जण प्रेम मिळण्यासाठी जादूटोणाचा मार्गही अवलंबतात. मात्र या पठ्ठ्याने जे काही केलंय, ते ऐकून तुम्ही ही म्हणाल, 'व्वा बेटा मौज कर दी'. हा भाऊ सिंगल. याला गर्लफ्रेंड नसल्यानं चिंताग्रस्त झालाय. याला कुठूनतरी आयडिया सुचली अन पठ्ठ्याने मुली भाव देत नाहीत म्हणून थेट आमदारांनाच पत्र लिहिलं. आमदार आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवतात. मात्र या भावाने स्वत:ची वैयक्तिक अडचण पत्राद्वारे आमदारांनाच सांगितलीय  राजूरा विधानसभा क्षेत्रातील तरुणाचे हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. (A young man from Chandrapur wrote a letter to Rajura constituency MLA Subhash Dhote as he did not have a girlfriend)

फ्रॅण्ड्रीतल्या जब्यासारखाच चंद्रपूरच्या भूषण राठोडलाही इश्काचा विंचू  चावलाय. चिमणीच्या शोधात भूषणच्या जीवाची पार राख झालीय. गर्लफ्रेंडच्या शोधात त्यानं नको नको ते कारनामे केले. पण त्याला काही पोरगी पटत नाही. अखेर हताश झालेल्य़ा भूषणनं आपली समस्या थेट आपल्या मतदारसंघाच्या आमदांकडेच नेली. पोरं पोरींना लव्ह लेटर लिहितात. पण या पठ्ठ्यानं लव्हबाबत थेट आमदार सुभाष धोटेंनाच लेटर लिहून आपली कैफियत मांडली.

मुलगी पटत नाही म्हणून आमदाराला पत्र 

"संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेन्ड नसल्यानं चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज फेरी मारतो. पण मला एकही मुलगी पटत नाही. दारु विकणा-यांना गर्लफ्रेन्ड असते. ते बघून माझा जीव जळून राख होतो. तरी माझी विनंती आहे. विधानसभा क्षेत्रातल्या युवतींना तुम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे की, आमच्या सारख्यांना सुद्धा लक्ष, भाव देण्यात यावा", अशा आशयाचं पत्र या पठ्ठ्याने आमदारांना लिहिलंय.

तेजाब सिनेमात लडकी पटाने के सौ तरीके अनिल कपूरनं सांगितले आहेत. भूषणनं यातले किती फंडे वापरले आहेत माहित नाही. पण त्यानं आमदारांनाच पत्र लिहून साकडं घातल्यामुळे आता आमदारसाहेब भूषणला काय वडिलकीचा सल्ला देतात याकडे नजरा लागल्या आहेत.