सरकारी शाळेत खासगी शिक्षक, पालकांनी सुरु केली स्कूलबस

राज्यातल्या कमी हजेरीपट असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. दुसरीकडे मात्र पुणे जिल्ह्यातल्या एका वस्तीवरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत आहेत. कोणती आहे ही शाळा आणि का आहे या शाळेत एवढी विद्यार्थी संख्या, पाहुयात हा विशेष वृत्तांत.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2018, 09:00 PM IST
सरकारी शाळेत खासगी शिक्षक, पालकांनी सुरु केली स्कूलबस  title=

पुणे : राज्यातल्या कमी हजेरीपट असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. दुसरीकडे मात्र पुणे जिल्ह्यातल्या एका वस्तीवरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत आहेत. कोणती आहे ही शाळा आणि का आहे या शाळेत एवढी विद्यार्थी संख्या, पाहुयात हा विशेष वृत्तांत.  

जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा

पुणेतल्या खेड तालुक्यातल्या रेटवडी इथली ही आहे सतारकावस्तीमधली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत तब्बल 360 विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे 20 ते 25 किलोमीटरचा बसप्रवास करुन हे विद्यार्थी या शाळेत येतात. आपल्या मुलानं याच शाळेत शिकावं म्हणून स्वतः पालकांनी स्वःखर्चातून सहा स्कूलबसची व्यवस्था केली आहे. 

 स्वःखर्चातून खासगी शिक्षकांची नेमणूक

मात्र एवढी विद्यार्थी संख्या असतानाही या शाळेत फक्त पाचच वर्ग खोल्या असून, अवघे आठच शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेशेजारच्या मंदिरात आणि शाळा व्हरांड्यात बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ग्रामस्थांनीच स्वःखर्चातून या ठिकाणी खाजगी शिक्षकांची नेमणूक केली आहे. विशेष बाब म्हणजे इथल्या विद्यार्थांवर प्रत्येक शिक्षक वैयक्तिक लक्ष देतो, तसंच प्रत्येक मुलाच्या अभ्यासाबरोबर क्रीडा प्रकारालाही तितकंच महत्व दिलं जातं.

मुलींसाठीचा नन्ही कली हा उपक्रम

राज्यात कुठे नव्हे तो मुलींसाठीचा नन्ही कली हा उपक्रम इथे टॅबवर मुलींना शिकवला जातो. मागल्या वर्षी या शाळेतले 141 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चमकले, तर एक विद्यार्थी राज्यात सहावा आला. तेव्हा ग्रामस्थांनी खूष होऊन इथल्या शिक्षकांना आल्टो कार आणि शिक्षिकांना हिरो प्लेजर गाडी भेट दिली.  

इंग्रजी ऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळेला पसंती

 या सतारकावस्ती जिल्हा परिषद शाळेतच आपलं मुल शिकावं यासाठी पालक, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मुलाला या शाळेत प्रवेश दाखल करत आहेत. याच मुळे या शाळेचे पुढल्या दोन वर्षांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. मात्र वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे नवीन वर्षात मुलांना कुठे बसवायचं हा मोठा प्रश्न शिक्षकांसह ग्रामस्थांनाही पडला आहे.