अहमदनगर : संगमनेर शहरानजीक बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या वखार महामंडळाच्या धान्य साठवणुकीच्या गोदामांना रात्री ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच गोदामातील संपूर्ण अन्नधान्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्याची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिका आणि सहकार महर्षी थोरात कारखान्याची अग्निशमन बंब दाखल झाले. सध्या ही आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट आणण्यात आली आहे.
शहरात उपलब्ध असलेले दोन्ही अग्नीशमन बंब आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरानजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वखार महामंडळाच्या धान्य साठवणूक करणाऱ्या गोदामातील एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यातच सदरचे अन्नधान्य बारदानात असल्याने आगीचे स्वरूप अधिक भीषण झाले. आगीच्या ज्वाळांनी गोदामावरील पत्रे अक्षरशः कस्पटासमान उडून इतरत्र पडत असल्याचे चित्र या वेळी क्षणोक्षणी दिसत आहे.संगमनेर नगरपालिका आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा अग्निशमन बंब गेल्या तासाभरापासून सदरची आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र अन्नधान्यानेच पेट घेतल्याने एकसारखी आग धुमसत आहे.
अहमदनगर । संगमनेर शहरानजीक बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या वखार महामंडळाच्या धान्य साठवणुकीच्या गोदामांना रात्री भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच गोदामातील संपूर्ण अन्नधान्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
#FIRE pic.twitter.com/HMaXcVdpfr
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 28, 2021
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही या आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे गोदाम पूर्णपणे जळून गेले गोदामाचा अर्धा भाग कोसळला होता या ठिकाणी तरुणांनी मोठी गर्दी केल्याने ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आगीचे वृत्त समजताच प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांचेसह पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आणि बाजार समितीचे सचिव सतिष गुंजाळ आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी होत असल्याने यंत्रणेला अधिक काळजी घ्यावी लागत होती.