'अरे, कार जरा हळू चालव,' कुटुंबासह जाणाऱ्याची विनंती, चालक म्हणाला 'ठीक आहे, तुम्ही पुढे जा', पुढच्या क्षणी मागून ठोकलं अन्...

पोलिसांनी जाणुनबुजून दुचाकीला घडक दिल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या धडकेत दुचाकीवरील महिला आणि सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 5, 2024, 12:46 PM IST
'अरे, कार जरा हळू चालव,' कुटुंबासह जाणाऱ्याची विनंती, चालक म्हणाला 'ठीक आहे, तुम्ही पुढे जा', पुढच्या क्षणी मागून ठोकलं अन्... title=

लातूरमध्ये मद्यधुंद चालकाने जाणुनबुजून एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन एक कुटुंब प्रवास करत होतं. धडकेनंतर दुचाकीवरील महिला आणि सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. लातूर-औसा मार्गावर ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 29 सप्टेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडली आहे. बेदरकारपणे वाहन चालवत असल्याने दुचाकीस्वार आणि कार चालकात शाब्दिक वाद झाला होता. याच वादातून कार चालकाने दुचाकीला धडक दिली, ज्यामद्ये दोघांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक शेख दुचाकीवरुन प्रवास करत होते. यावेळी त्यांच्यासह त्यांची पत्नी इकरा शेख आणि 6 वर्षीय नादिया आणि अहाद ही दोन मुलं होतं. दुचाकीवरुन प्रवास करत असतानाच बेदरकारपणे धावणारी एक कार त्यांच्या बाजूने वेगाने केली आणि धोकादायकरित्या कट मारला. चालक यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. यानंतर सादिक यांनी कारलाचकाला गाठलं आणि थोडं सांभाळून कार चालवण्याची विनंती केली.

पण यावेळी त्यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. यानंतर कारचालकाने सादिक यांना पुढे जाऊ दिलं. पण काही वेळातच चालकाने मागून जात सादिक यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक जोरदार असल्याने शेख यांची पत्नी इकरा शेख आणि सहा वर्षांची नादिया शेख गंभीर जखमी झाले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

सादिक शेख आणि मुलगा अहद दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल यांनी सांगितलं आहे की, दिगंबर पटोले, कृष्णा वाघे, बसवराज धोत्रे, मनोज माने आणि मुदमे हे पाचजण कारमध्ये होते. या पाचही जणांना वेगवेगळ्या कलमांखाली अटक करण्यात आलं आहे. त्यांच्यावर बेजबाबदारपणे तसंच मद्यधुंद अवस्थेत कार चालवण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.