SSC Exam : मोठ्या धीराची ग बाय! घरी वडिलांचे पार्थिव...डोळ्यात अश्रू साठवून प्राचीने दिली दहावीची परीक्षा

SSC Exam : अत्यंत कठीण प्रसंग या मुलीवर ओढावला. वडिलांचा मृत्यू झाला असताना तिने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलांचे पार्थिव असताना डोळ्यात अश्रू साठवून या विद्यार्थिनीने परीक्षा दिली आहे. 

Updated: Mar 7, 2023, 06:42 PM IST
SSC Exam : मोठ्या धीराची ग बाय!  घरी वडिलांचे पार्थिव...डोळ्यात अश्रू साठवून प्राचीने दिली दहावीची परीक्षा

प्रवीण तांडेकर; झी मीडिया, गोंदिया : राज्यभरात दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरु आहे. विद्यार्थी सध्या परिक्षेच्या चिंतेत आहेत. मात्र, भंडारा (Bhandara) येथील एका विद्यार्थिनीवर मन हेलावून टाकणारा प्रसंग ओढावला आहे. परीक्षेच्या दिवशीच वडिलांचा मृत्यू झाला. घरी वडिलांचे पार्थिव असताना डोळ्यात अश्रू साठवून या विद्यार्थीनीने परीक्षा दिली आहे. 

6 मार्च रोजी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. मात्र, पेपरच्या दिवशीच वडिलांचा मृत्यू झाला. संपूर्ण कुटूंबाला धक्का बसला गावात शोकाकूल वातारण निर्माण झाले. वडिलांच्या अंत्यविधीची तयारी सुरु असताना मुलीने दहावीचा पेपर देण्याची तयारी दर्शवली. काळजावर दगड ठेवत या विद्यार्थिनीने दहावीचा इंग्रजीचा पेपर दिला.

भंडारा जिल्ह्यात ही विदारक घटना घडली आहे. वडिलांचा पार्थिव घरी असताना मुलीने दहावीचं पेपर दिला आहे. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील ही घटना आहे. प्राची राधेश्याम सोंदरकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.  प्राचीच्या वडिलांचा महाशिवरात्रीच्या दिवशी लाखांदूरवरून गावी सोनीकडे जात असतांना मेंढा फाट्याजवळ अपघात झाला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातग्रस्त राधेशाम यांना दोन मुली असून, मोठी मुलगी प्राची दहावी तर लहान मुलगी सातवी इयत्तेत शिक्षण घेत आहे. 

वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राचीची दहावीची परीक्षा सुरु झाली. प्राचीने दहावीच्या परीक्षेची तयारी अविरत सुरु ठेवली होते. 6 मार्च रोजी इंग्रजीच्या पेपरची तयार करत असताना अचानक प्राचीच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त आले. वडीलांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच प्राची निशब्द झाली. 

प्राचीच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. शेजारी एकवटले, गाव गोळा झाला. बघता बघत घरासमोर गर्दी झाली. सर्वत्र शोकाकूल वातावरणात पसरले. घरच्यांनी तर हंबरडा फोडला. मात्र, प्राचीने वडिलांच्या मृत्यूचे दु:ख लपवून ठेवत न रडता आपले ध्येय गाठयचा पण केला आणि तिने परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला. 

थोड्यात वेळात तिच्या वडिलांचे पार्थिव घरी आणले गेले. प्राचीने आदर्श इंग्लिश हायस्कूल देसाईगंज वडसा येथील परीक्षा केंद्र गाठले. प्राचीच्या हायस्कुलचे मुख्याध्यापक यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी प्राचीला पेपर सोडविण्यासाठी धीर दिला. तुला वडिलांची स्वप्नपूर्ती करायची आहे असे मुख्याध्यापकांनी सांगितले. घरी वडिलांचा अंत्यविधी असतांना प्राचीने धैर्याने परीक्षा दिली आहे. प्राचीच्या या धाडसी निर्णयामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.