लातूर जिल्ह्यात ८ कोरोना पॉझिटीव्ह

आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नसणाऱ्या लातुरमध्ये ८ रुग्ण आढळले

Updated: Apr 4, 2020, 07:11 PM IST
लातूर जिल्ह्यात ८ कोरोना पॉझिटीव्ह title=

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नव्हता. मात्र आज २० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ८ जणांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत. ही माहीती लातूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी 'झी २४ तास'ला बोलताना दिली. 

हे कोरोना पॉझिटीव्ह आलेले हे ०८ रुग्ण आंध्र प्रदेश राज्याच्या कर्नुल जिल्ह्यातील आहेत. ते हरियाणातील फिरोजपूर गिरखा येथील एका धार्मिक कार्यक्रमात गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते रेल्वेने येण्याऐवजी रस्त्यामार्गे हरियाणातून महाराष्ट्रात आले. 

पुढे उस्मानाबाद मार्गे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे ते २ एप्रिलच्या मध्यरात्री एका प्रार्थना स्थळात ( मशिदीत ) आले होते. ते पुढे आंध्र प्रदेशातील कर्नुल येथे जाणार होते. मात्र  ते ज्या चार चाकी गाडीतून आले होते. त्या गाडीचा ड्रायव्हर त्यांना सोडून त्याने हरियाणाकडे पळ काढला. 

या सर्व १२ जणांनी निलंग्यातील त्या प्रार्थना स्थळात ( मशिदीत ) मुक्काम केला. त्यानंतर त्यांना काल ३ एप्रिल रोजी  ताब्यात घेऊन त्यांचे अहवाल पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 

२० जणांचे अहवाल पाठविले होते. त्यापैकी ८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या सर्व रुग्णांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कोरोना विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.  

दरम्यान प्रार्थना स्थळात त्यांना मुक्काम करण्याची परवानगी ज्यांनी दिली त्यांच्या विरोधात आता कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याशिवाय त्या १२ जणांच्या संपर्कात जे आले त्यांचीही तपासणी केली जाणार आहे.