ऊसाला टनामागे ५५ रुपयांचं अनुदान, सरकारची घोषणा

आपल्या राज्यात शेतकऱ्यांचे ३२०० कोटी रुपये ऊस बिलाचे कारखान्यांकडे थकले आहेत

Updated: May 3, 2018, 07:19 AM IST
ऊसाला टनामागे ५५ रुपयांचं अनुदान, सरकारची घोषणा title=

मुंबई : ऊसाला टनामागे केवळ ५५ रुपये अनुदान देऊन केंद्र सरकारनं ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. केंद्र सरकारने आज देशातील ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना टनामागे ५५ रुपये म्हणजेच क्विंटलला साडे पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. साखरेचे दर कोसळल्यामुळे राज्यासह देशभरातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत.  साखरेचे भावटनाला २४०० रुपयांपर्यंत कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देणंही कारखान्यांना परवडत नाही. त्यामुळे देशातील ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे २५ हजार कोटी रुपये ऊस बिलाचे कारखान्यांकडे थकीत आहेत. 

आपल्या राज्यात शेतकऱ्यांचे ३२०० कोटी रुपये ऊस बिलाचे कारखान्यांकडे थकले आहेत. साखरेचे दर कोसळल्यामुळे टनामागे १००० ते १२०० रुपये तोटा होत असल्याने कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैस थकत आहेत.

साखरेचे दर वाढावेत म्हणून २० लाख टन साखर निर्यात करावी आणि ३० लाख टन साखरेचा साठा करावा, अशी मागणी साखर उद्यागोकडून होत आहे.

मात्र, त्याबाबत केंद्र सरकार कोणतीही पावलं उचलत नसल्याने साखर उत्पादकांमध्ये नाराजी आहे. ऊसाला टनामागे ५५ रुपये अनुदान देऊन काही साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होतेय.