मेळघाटात बालमृत्यू केव्हा थांबणार? तीन महिन्यात तब्बल इतक्या बालकांचा मृत्यू तर ४०९ बालके तीव्र कुपोषणाने पीडित

देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली त्याच दिवशी आदिवासी भागाचे हे वास्तव पुढे आले आहे

Updated: Jul 27, 2022, 07:26 PM IST
मेळघाटात बालमृत्यू केव्हा थांबणार? तीन महिन्यात तब्बल इतक्या बालकांचा मृत्यू तर ४०९ बालके तीव्र कुपोषणाने पीडित title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मेळघाट (Melghat) या आदिवासीबहुल भागात कुपोषित बालके (Child malnutrition) आणि बालमृत्यूंच्या संख्येत कोणतीही घट न झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य सुविधांपासून ते आदिवासींचे जीवनमान सुधारण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना फोल ठरल्याचे चित्र आहे.

कुपोषणाने ग्रासलेल्या मेळघाटात अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये १७ उपजत आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३५ बालकांचा समावेश आहे. तर तीव्र कुपोषणाने ४०९ बालके पीडित आहेत. 

धारणी व चिखलदरा तालुक्यांतील या बालकांना वाचविण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमधून अमायलेजयुक्त पोषण आहार देण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली त्याच दिवशी आदिवासी भागाचे हे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीनंतर या परिस्थितीमध्ये काही बदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, धारणी व चिखलदरा तालुक्यांत न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत दोन्ही तालुक्यांत ४२५ पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रांतून स्तनदा गर्भवती माता व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार शिजवून दिला जातो.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, धारणी व चिखलदरा तालुक्यामध्ये एप्रिल २०२२ मध्ये ६१०, मे मध्ये ४२२ तर जूनमध्ये ४२० अशा एकूण १४५२ बालकांचा जन्म झाला आहे. यापैकी एप्रिलमध्ये १५, मे महिन्यामध्ये सात, जूनमध्ये १३ तर जुलै महिन्यात १७ अशा एकूण ५२ बालकांचा मृत्यू झाला आहे.