आरबीएल बँकेच्या ग्राहकांची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

ऑनलाईन व्यवहारात ग्राहकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार

Updated: Nov 20, 2019, 01:45 PM IST
आरबीएल बँकेच्या ग्राहकांची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक title=
संग्रहित फोटो

नाशिक : नाशिकमध्ये बँकेच्या ऑनलाईन व्यवहारात ग्राहकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील आरबीएल बँकेच्या ३२  ग्राहकांची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रेडीट कार्ड अॅक्टिवेशनच्या नावाखाली ग्राहकांना फोन आले. त्यानंतर ग्राहकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचं सर्व्हर हॅक झाल्याचा ग्राहकांना संशय आहे. 

बॅंकेतून बोलतोय असं सांगून क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी कॉल आले. त्याच दरम्यान ग्राहकांकडून ओटीपी मिळवत, त्यातून फसवणूक झाल्याचं ब्रँच अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.  फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. 

नाशिकमध्ये आरबीएल बँकेची ही एकमेव ब्रँच आहे. १० दिवसांमध्ये ग्राहकांचे १६ लाख रुपये उकळल्याची माहिती मिळत आहे. इतका डेटा हॅकर्सकडे गेलाच कसा यावर प्रश्नचिन्ह असून बँकेचा सर्व्हर हॅक झाल्याचा संशय ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

या प्रकरणानंतर आता नाशिक पोलीस, सायबर पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.