महाबळेश्वरमध्ये 2500 एकरात स्ट्रॉबेरेची लागवड

जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असणा-या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच हजार एकर क्षेत्रात स्ट्रॅाबेरी लागवड झाली आहे. 

Updated: Jan 5, 2018, 07:47 PM IST
महाबळेश्वरमध्ये 2500 एकरात स्ट्रॉबेरेची लागवड  title=

महाबळेश्वर : जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असणा-या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच हजार एकर क्षेत्रात स्ट्रॅाबेरी लागवड झाली आहे. 

थंडीमुळे दर्जेदार उत्पन्न होतंय. दररोज 70 टन स्ट्रॅाबेरी देशभरात विक्रीला जाऊ लागली आहेत. महाबळेश्वरसह अन्य तालुक्‍यांत स्ट्रॉबेरीचा दुसरा बहर सुरू झालाय. सध्या असलेली थंडी स्ट्रॉबेरी पिकासाठी उपयुक्त ठरतेय. एकट्या महाबळेश्वरसह इतर तालुक्‍यांतून रोज 65 ते 70 टन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी जातेय. 

जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्‍यासह जावळी, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्‍यांत परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट झालीय. एकूण झालेल्या लागवडीत महाबळेश्वर तालुक्‍यात सार्वधिक 2500 एकर तर अन्य तालुक्‍यांत सुमारे एक हजार एकर असं एकूण साडेतीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झालीय. सध्या स्ट्रॉबेरीला 172 ते 200 रुपये प्रतिकिलो दर सुरु आहे.

महाबळेश्वर तालुक्‍यातून मुंबई, पुणेसह बेंगळूर, हैदराबाद, कोलकता, रांची आदी मोठ्या शहरांत विक्रीसाठी जातेय. तसंच दोन ते तीन टन स्ट्रॉबेरी प्रक्रियेसाठी जातेय. तर शेतकरी पर्यटकांनाच स्ट्रॉबेरीची थेट विक्री करण्यावर भर देतायत. मोठ्या शेतक-यांकडून बॉक्‍स पॅकिंग करून स्ट्रॉबेरी पाठवली जात असल्यामुळे त्याला चांगला दर मिळण्यास मदत होते. 

यंदा जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवडीस उशीर झाल्याने हंगामही उशिरा सुरू झालाय. परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या दुस-या बहरातील सुमारे २० ते २५ टक्के उत्पादनात घट झालीय. हा हंगाम एप्रिल, मे महिन्यांपर्यंत सुरू राहण्याची शक्‍यता आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यांतील पाणीटंचाईच्या स्थितीवर हंगामाचे चित्र स्पष्ट होईल. सध्या स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरळीत सुरू असून समाधानकारक दर मिळतायत. एप्रिल आणि मेपर्यंत हंगाम सुरू राहील असा अंदाज आहे.