नर्मदेत बोटीला जलसमाधी; सात जणांचा मृत्यू

नदीच्या काठावर बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.

Updated: Jan 15, 2019, 06:39 PM IST
नर्मदेत बोटीला जलसमाधी; सात जणांचा मृत्यू title=

नंदुरबार: नंदुरबारच्या धडगाव येथील नर्मदा नदीच्या पात्रात मंगळवारी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत  सात जणांचा मृत्यू झाला असून ४३ जणांना वाचवण्यात यश आले. धडगावच्या भुसा पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली. येथील स्थानिक आदिवासींमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी नर्मदा स्नानाला जाण्याची प्रथा आहे. त्यासाठीच काहीजण बोटीने नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जात होते. मात्र, या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने ही बोट उलटली. स्थानिक लोक आणि प्रशासनाने यापैकी अनेकांना बाहेर काढले. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या होत्या. मात्र, आता परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली असून शोधकार्य थांबवण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले होते. एका बोटीत ५० भाविक बसून नदीत फेरफटका मारत असताना वजनाने बोट उलटून ४० जण जखमी झाले. ही माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू झाल्यानंतर भाविकांना वाचवण्यात आले. ४० जण गंभीरपणे जखमी झाल्याने त्यांना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येत होत़. दुपारी गंभीर रुग्णांना नंदुरबार आणि धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत होते.