नाशिक : नाशिक पोलीस आणि लाचखोरी हे जणू काही समीकरणच बनलं आहे. गेल्या आठवड्यात दोन पोलीस निरीक्षकांना काही तासांच्या फरकाने लाच घेतांना एसीबीने रंगेहाथ पकडलं. एसीबीच्या या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या या कृत्यामुळे लाचखोर पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागत असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जाते आहे.
नाशिक पोलीस आणि लाच हे समीकरण काही नवीन नाही. यापूर्वी नाशिकमध्ये बऱ्याचदा पोलिसांना लाच घेतांना एसीबीने अटक केली. त्यात आणखी भर पडली. ती नव्या दोन लाचखोरीच्या प्रकरणांच्या घटनेची. साउंड सिस्टीम वाजविण्यासाठी परवानगी देताना २२ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यात शुक्रवारी नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे आणि सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष देवरे यांना एसीबीने सापळा रचत लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. विशेष म्हणजे ही घटना पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याच्या अगदी भिंतीला लागून असलेल्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये घडली.
नागदरे यांनी परवानगी देण्यासाठी थेट २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती २२ हजार रुपये ठरले. या घटनेला काही तास होत नाही, त्यात नाशिकच्या सातपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विलास जाधव याला एसीबीने लाच घेतांना रंगेहाथ पकडले. एका गुन्ह्यातील वाहन सोडविण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागितली होती. विशेष म्हणजे हे वाहन सोडण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतांना हा कारनामा जाधव यांनी केला होता.
जाधव आणि एसीबीची करावाई ही बाब काही नवीन नाही. त्यांच्यावर एसीबीची कारवाईची ही तिसऱ्यांदा वेळ आहे. जाधव यांच्यावर ठाण्यात असतांना कारवाई झालीय. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून नाशिककरांकडून पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागते आहे.
या तिन्ही लाचखोर पोलिसांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्पुरती निलंबनाची कारवाई केली आहे. अंतर्गत कारवाई असल्यानं प्रतिक्रिया देण्यास माध्यमांना नकार दिला गेला आहे. मात्र एरवी पोलीस अधिकारी उत्कृष्ठ कामगिरीचा उदोउदो करण्यासाठी पत्रकार परिषदा घेतात. मात्र अशा घटनांवर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र अशा लाचखोरीच्या घटनांनी नाशिक पोलिसांची प्रतिमा मलिन होते आहे. यापूर्वी देखील असेच प्रकरणे पुढे आले होते. मात्र त्यानंतर कठोर कारवाई न होता लाचखोर पोलीस सन्मानाने कर्तव्यावर रुज्जू झाले. मात्र आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.