सतीष मोहिते, झी मीडिया, नांदेड : लग्न सोहळ्यात अशी घटना घडली ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. लग्न सोहळ्यात झालेला मृत्यू मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. नांदेडमध्ये (Nanded) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे लग्न सोहळ्यात दु:खाचे वातावरण पसरले (Shocking News).
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या एका गावात ही धक्कादायक घटना आहे. मुतेन्ना जामगेवाड (वय 18 वर्षे ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुतेन्ना हा शिवणी गावात राहत होता. शिवणी गावाजवळच असलेल्या म्हैसा पारडी या गावात एका विवाह सोहळयात सहभागी होण्यासाठी तो गेला होता.
रात्री विवाह सोहळ्यानिमित्ताने लग्नाच्या मंडपात सगळेजण डिजेच्या तालावर नाचत होते. मुतेन्ना देखील डीजेच्या तालावर ठेका धरत नाचत होता. नाचत असताना अचानक तो काही सेकंद स्तब्ध झाला आणि काही क्षणात थेट जमिनीवर कोसळला. सुरुवातीला तो एखादी डान्स स्टेप करत असेल असे सर्वांना वाटले. पण खाली कोसळल्या नंतर तो उठलाच नाही. मुतेन्ना नाचत असताना त्याचे मित्र मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करत होते. त्यामुळे त्याचा मृत्यूचा नेमका क्षण मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
मुतेन्ना याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. नाचत असताना मुतेन्ना याला हार्ट अटॅक आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. विवाह सोहळ्यात अशा प्रकारे तरुणाचा मृत्यू झाल्याने दुःखाचे वातावरण पसरले. मुतेन्ना ज्या शिवणी गावातील आहे तिथेही शोककळा पसरली.
मुलीचे कन्यादान करण्याआधीच पित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याती घटना जळगावमध्ये घडली होती. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या मांडवे बुद्रुक गावात ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे.
अरुण कासम तडवी असे वधू पित्याचे नाव आहे. मुलीचे लग्न असल्याने तडवी खूपच आनंदी होते. आपल्या मुलीच्या विवाह निमित्त हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तडवी यांचा मृत्यू झाला आहे.