हिंगोली : औंढा तालुक्यातील ढेगज येथे आपल्या बहिणीचा फोटो मोबाईलमध्ये ठेवला म्हणून अल्पवयीन मुलांनी त्या मुलास जीवे ठार मारल्याची घटना ताजी असतानाच आता सेनगाव (Sengaon ) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय.
सेनगाव तालुक्यातील दहा वर्षाची चिमुकली आपल्या गावातून एकटीच शेताकडे किराणा सामान घेऊन जात होती. तिला एकटी पाहून 16 वर्षीय मुलाने तिचा रस्ता अडवला. त्या मुलीच्या गळ्यातील ओढणीने तिचे तोंड दाबून काही अंतरापर्यत तिला उचलून नेले.
त्या मुलाने त्यानंतर तिचे कपडे अर्धवट काढत तिचा विनयभंग करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत कुणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकीही त्या मुलाने दिली.
मात्र, पीडित मुलीने या प्रकाराची माहिती आईला दिली. पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 354 (अ) 506 भादवीप्रमाणे सेनगाव पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर घटनेचा पोलीस तपास करत असून या घटनांमुळे हिंगोली जिल्ह्यातील पालकवर्गात खळबळ माजली आहे.