राज्यात शनिवार अपघातवार, १५ जणांचा मृत्यू

शनिवार अपघातवार ठरला आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला.

Updated: Jul 20, 2019, 03:27 PM IST
राज्यात शनिवार अपघातवार, १५ जणांचा मृत्यू title=

मुंबई : शनिवार अपघातवार ठरला आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर कदम वाक वस्तीजवळ झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर याच मार्गावर आणखी एक अपघात झाला. फुले वाहून नेणाऱ्या टेम्पोला अपघात होऊन दोघे जखमी झालेत. कल्याणमध्ये वायधुनी पुलावर अपघातात दोघांचा, बीडमध्ये तिघांचा तर वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघातात ९ विद्यार्थी जागीच ठार झालेत. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला.  काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते. ते घरी परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू तथा नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज अशी मृतांची नावे आहेत.  सर्व यवत येथील रहिवासी आहेत.

तरुणांना वाहनाने चिरडले 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गडी माजलगाव महामार्गावर व्यायामासाठी आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी तळेवाडी शिवारात घडली. या अपघातात तिघांचा ही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

महामार्गाच्या कडेला व्यायाम करत भरधान वाहनाने धडक दिली. यात तीन शालेय विद्यार्थी ठार झालेत. गेवराई तालुक्यातील गढी जवळ ही घटना घडली. हे तीनही शालेय विद्यार्थी गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील आहेत. सुनील प्रकाश थोटे (१४), तुकाराम विठ्ठल यमगर (१६) आणि अभिषेक भगवान जाधव (१४) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघे कल्याण -विशाखापट्टणम या महामार्गावर व्यायाम करण्यासाठी गेले होते. यावेळी अज्ञात वाहनाने तिघांना पाठीमागून जोरदार धडक देत चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांसह ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.  

 टेम्पोची दुचाकीला धडक 

कल्याण आणि उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी पुलावर भरधाव टेम्पो आणि मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन जण जागीच ठार झालेत. भरधाव टेम्पो उल्हासनगरहून कल्याणच्या दिशेने येत होता. त्यावेळी या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात योगेश पवार आणि अनिल भिसे या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे मुरबाड इथल्या सरळगाव इथे राहणारे आहेत. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.