कोल्हापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकार अनेक महत्त्वाची पाउलं उचलताना दिसत. कोरोनाच्या आणखी प्रसार होवू नये म्हणून पूर्ण भारतात लॉकडाउन करण्याचा निर्णय मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. पुढच्या २१ दिवसांपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आणीबाणीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. अशात अनेक नागरिकांनी रोजच्या सामानासाठी दुकानांबाहेर गर्दी केल्याचं चित्र दिसून येत होतं. पण कोल्हापूर आणि शिर्डीच्या ग्रामीण भागातील दुकानदार आणि ग्राहकांनी किती शहाणपणा दाखवला आहे.
दुकानात खरेदी करताना कोल्हापुरातील कळे गावातील गावकरी कोणतीही गर्दी करता दिसले नाहीत. जी वर्तुळं आखण्यात आली आहेत. त्या वर्तुळात उभं राहून ते आपल्या खरेदीच्या वेळेची वाट पाहत आहेत. अगदी भाजीच्या दुकानासमोरही अशीच वर्तुळं आखण्यात आली आहेत. दुकानदारांच्या या कल्पनेला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
विनाकारण वस्तूंचा साठा करु नका, गरज असेल तेवढंच सामान घेऊन जा असंही दुकानदार सांगतात. शिवाय व्हॉट्सऍपवर सामानाची यादी दिल्यास सामान घरपोच देण्याची तयारीही दुकानदारांनी दाखवलीय. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिस्त पाळली जाऊ शकते. मग ती शहरात का नाही. शहरातल्या माणसानं थोडा शहाणपणा दाखवला तर कोरोना आपल्या जवळही फिरकणार नाही. त्यामुळं खरेदी करा पण थोडं अंतर ठेऊन.