Womens Day 2024: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारताच्या वाघिणींना सलाम; यांची नावं लक्षात ठेवाच!

"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी" हळवी, सोज्वळ, मायाळू अशा शब्दात स्त्री वर्णन केलं जातं. पण हीच स्त्री जेव्हा अन्यायाविरुद्ध बंड पुकारते, तेव्हा ती वाघीण, दुर्गा, आणि चंडिकेचं रूप धारण करते.   

Updated: Mar 8, 2024, 09:40 AM IST
Womens Day 2024: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारताच्या वाघिणींना सलाम; यांची नावं लक्षात ठेवाच! title=

तृप्ती गायकवाड,झी मीडिया,मुंबई: स्वराज्यावर आभाळाइतकी माया करणाऱ्या पण वेळप्रसंगी आपल्या लेकरासारख्या रयतेसाठी गनिमांवर चालून जाणाऱ्या वीर जिजाऊंनी या जगाला शिकवण दिली. स्त्री जशी हातात बांगड्या भरून घर सांभाळते, तशीच ती हातात तलवार घेऊन शत्रूचा जीवही घेऊ शकते. जिजाऊंचा हाच वारसा पुढे चालवणाऱ्या रणरागिनींची गोष्ट या जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊयात.

जनरल लेफ्टनंट नितीका धोंडियाल


मेजर विभूती शंकर धोंडियाल यांची पत्नी नितीका धोंडियाल. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर विभूती शंकर धोंडियाल यांना वीरमरण आले.  लग्नाला अवघे दहा महिने झाले आणि मेजर विभूती शंकर धोंडियाल यांनी जगाचा निरोप घेतला. पती शहिद झाल्यानंतर नितीका यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. सातत्य आणि अथक प्रयत्नाने या रणरागिणीने  भारतीय सैन्यात लेफ्टनंट नितीका धोंडियाल अशी ओळख निर्माण केली.

लेफ्टनंट कनिका राणे


मूळचे कोकणातले पण  मिरारोड येथे राहणाऱ्या राणे कुटूंबाची सून लेफ्टनंट कनिका राणे.  2018 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरगती प्राप्त झाली.खरंतर कनिका या पेशाने बँकर होत्या मात्र मेजर शहीद झाल्यानंतर त्यांनी सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय घेणं त्यांना सोपं नव्हतं. पदरात असलेल्या दोन वर्षाच्या मुलाची जबाबदारी खांद्यावर  होती. असं असूनही त्या सैन्यात भरती व्हायचंच यावर ठाम होत्या. संयम आणि अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करत राणे कुटुंबाची सून भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कनिका राणे म्हणून देशसेवा करीत आहेत.

लेफ्टनंट गौरी महाडिक


आलेल्या संकटांना हार न मानता धाडसाने सामोऱ्या जाणाऱ्या विरारच्या गौरी महाडिक यांच्या संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. 2015 मध्ये गौरी आणि मेजर प्रसाद महाडिक यांचा विवाह झाला. प्रसाद महाडिक हे अरुणाचल प्रदेश येथे भारत-चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद झाले. मेजर प्रसाद यांचं देशसेवेचं अपूर्ण राहिलेलं व्रत हाती घेत, गौरी यांनी चेन्नई येथे सैन्य भरतीचं प्रशिक्षण पूर्ण केलं. कायद्याची पदवी प्राप्त केलेल्या गौरी महाडिक यांनी सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण करत, आज त्या भारतीय सुरक्षा दलात लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहे. स्त्री कधीच सामान्य नसते, तिने मनात आणलं तर ती  असामान्य विजय प्राप्त करते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे लेफ्टनंट गौरी महाडिक.

लताबाई करे


"लहरोंसे डरकर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नही होती". या काव्यपंक्ती वाचताना आणि ऐकताना जितक्या सोप्या वाटतात, तेवढयाच त्या जगायला खडतर  आहेत. असं असलं तरी लताबाई करे यांनी अशक्यही शक्य करून दाखवलं. पतीच्या हृदयविकारावर उपचारासाठी पैशांची जमवाजमव करता यावी याकरिता लताबाई करे यांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. महागड्या शूजविना तरुणांना ही लाजवेल या ऊर्जेने लताबाई करे यांनी मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. त्यांच्या जिद्दीची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. 

आलेल्या आव्हानांना धीरानं सामोरं जात आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणाऱ्या, सामन्यातील असामान्य असलेल्या या वाघिणींना जागतिक महिला दिनानिमित्त झी 24 तासचा मानाचा सलाम.