Tulsi Vivah: नववधुप्रमाणे सजवा तुळशी वृंदावन, साजश्रृंगारासाठी अशी करा तयारी; शेजारीही कौतुक करतील

How to Decorate Tulsi Plant for Tulsi Vivah: तुळशी विवाहासाठी तुळशीचे रोप कसे सजवाल? पाहा या काही आयडियास तुमचे तुळशीचं रोपही चारचौघात उठून दिसेल  

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 13, 2024, 07:31 AM IST
Tulsi Vivah: नववधुप्रमाणे सजवा तुळशी वृंदावन, साजश्रृंगारासाठी अशी करा तयारी; शेजारीही कौतुक करतील title=
tulsi vivah 2024 tips to decorate tulsi plant check these ideas

How to Decorate Tulsi Plant for Tulsi Vivah: तुळशी विवाह हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आजपासून कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्यात येणार आहे. या दिवसांत भगवान विष्णु यांच्या शाळिग्राम रुपासोबत तुळशी विवाह संपन्न होतो. तुळशी विवाहासाठी तुळशी वृंदावनाला नववधुप्रमाणे सजवले जाते. तुळशीच्या चारही बाजूला दिवे लावून पूजा केली जाते. कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे.

हिंदू पंचागानुसार, तुळशी विवाह प्रत्येक वर्षी कार्तिक महिनेच्या शुल्क पक्ष द्वादशीला साजरा केला जातो. यंदा 13 नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात तुळशी विवाहाचे महत्त्व अधिक आहे. या दिवसांपासूनच घराघरांत लग्नासमारंभास सुरुवात केली आहे. तर, अनेक घरात तुळशी विवाह केला जातो. यावेळी महिला तुळशीच्या रोपाला नववधुप्रमाणे सजवतात. नववधुचे अलंकार, साडी चोळी असे वस्त्र परिधान करतात. तुम्हालादेखील तुळशी वृंदावनाला छान सजवायचे आहे का, तर या टिप्स फॉलो करा. 

तुम्ही जर शहरात राहत असाल पण तुम्हालाही हा सण साजरा करायचा आहे. पण अपुऱ्या जागेमुळं बंधनं येत असतील तर तुम्ही या टिप्स वाचल्याच पाहिजेत. तुळशी वृंदावन एका तिवईवर ठेवा जेणेकरुन तुम्हाला सजवताना अडचणी येणार नाहीत. तुळशीला नववधुप्रमाणे सजवण्यासाठी तुम्हाला साडी, बांगड्या, कबंरपट्टा, हार, ओढणी, कुंकु, कर्णफुले यांची गरज भासणार आहे. पण या सगळ्या वस्तु नवीन असायला हव्यात, हे लक्षात घ्या. 

हल्ली बाजारात देवीसाठी व लहान मुलींसाठी रेडिमेड साड्या मिळतात. त्याचा वापरही तुम्ही करु शकता. या साड्या तुळशीच्या कुंडीभोवती गुंडाळुन घ्या व पिनाच्या सहाय्याने चांगल्या बांधून घ्या. तुळशीसाठी लाल, पिवळा, हिरवा किंवा गुलाबी रंगाची साडी जास्त उठून दिसेल. साडी नेसल्यानंतर तुळशीच्या रोपावर एक लाल रंगाची ओढणी द्या. नंतर तुळशीच्या रोपावर हिरव्या बांगड्या व दागिने घाला. तुमचं तुळशी वृंदावन अगदी नववधुसारखी दिसेल.

तुळशीचे रोप तुम्ही फुलांनीदेखील सजवू शकता. तसंच, बाजारात हल्ली मुखवटेदेखील मिळतात. हा मुखवटा तुम्ही तुळशी वृंदावनावर ठेवून नंतर कुंडीला साडी नेसवून घ्या. नंतर मुखवट्याला नथ, कर्णफुले हार घाला. तसंच, वृदांवन छान फुलांनी सजवा.