मुलांच्या गळ्यात रोज टाय घालणं ठरू शकतं घातक! वैज्ञानिक कारण जाणून घ्या

अनेक शाळांमध्ये टाय हा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा एक भाग आहे. मात्र घट्ट अगदी गळ्यालगत टाय घालणे विद्यार्थ्यांसाठी ठरु शकते घातक. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 8, 2024, 06:52 PM IST
मुलांच्या गळ्यात रोज टाय घालणं ठरू शकतं घातक! वैज्ञानिक कारण जाणून घ्या title=

शाळा सुरु होऊन काही दिवस झालेत. अनेक शाळांचा युनिफॉर्म ठरला असेल. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशात टाय देखील असेल. मुलांना जवळपास ६ तास गळ्यात टाय बांधून ठेवणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून घातक असल्याचं अभ्यासात समोर आलं आहे. 

मुलं जवळपास दिवसभर या गणवेशात असतात. त्यामुळे त्या टायचा त्यांच्या शरीरावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अभ्यासानुसार, टाय घातल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा 7.5 टक्क्यांनी कमी होतो. एवढंच नव्हे तर टाय घातल्याने डोळ्यांवर दबाव पडू शकतो. ज्यामध्ये ग्लुकोमा आणि मोतिबिंदूचा धोका अधिक असतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, टायने विद्यार्थ्यांना गणवेश परिपूर्ण होत असेल पण त्यांच्या आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होत आहे. 

अभ्यासात खुलासा

कील युनिर्व्हसिटी रुग्णालयाचे वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, टाय घालणे हे सामाजिक स्वरुपात गळा आवळण्यासमानच आहे. न्यू सायंटिस्टमध्ये प्रकाशित झालेल्या अध्ययनात यावर अभ्यास करण्यात आला आणि टाय घालणे हे मेंदू आणि मेंदूमधील रक्तप्रवाहावर परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. 

एमआरआयने मेंदू केला स्कॅन 

अभ्यासात एकूण 30 व्यक्तींचा समावेश करण्यात आला. यामध्ये 15 लोकं दररोज टाय घालणारे होते तर 15 लोकं टाय न घालणारे होते. एमआरआय तर्फे मेंदू स्कॅन करण्यात आला. कारण मेंदूतील रक्तप्रवाहाची माहिती मिळेल. संशोधनात असे दिसून आले की, टाय न घालणाऱ्या लोकांच्या तुलनेत टाय घालणाऱ्या लोकांच्या मेंदूतील रक्तप्रवाह हा ७.५ टक्क्यांनी कमी होता. संशोधकांनी कमी रक्त प्रवाहाला संकुचित कॅरोटिड धमण्या जबाबदार असल्याचे सांगितले. टायच्या प्रेशरमुळे हृदयातील रक्त दूर गेल्याचे सांगण्यात आले आहे.  

संशोधन हे तीस व्यक्तींवर करण्यात आले असले तरीही तसाच परिणाम विद्यार्थ्यांच्या मेंदूवर होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी टायबाबत सतर्क असणे जास्त गरजेचे आहे. 

पालकांनी काय काळजी घ्यावी 

पालकांनी टाय बांधताना विशेष काळजी घ्यावी 
टाय थोडी सैलसर बांधावी 
विद्यार्थ्यांच्या मानेला घट्ट आवळून टाय बांधू नये. 
तसेच मुलांना टायचा त्रास होत असल्यास शिक्षकांना निदर्शनास आणून द्यायला सांगावे. 
गणवेश हा शाळेचा अविभाज्य भाग आहे. पालकांनी शिक्षकांशी संवाद साधून ही गोष्ट बोलावी.