स्टील की प्लास्टिक? मुलांना शाळेत नेण्यासाठी कोणता डबा-बॉटल राहील बेस्ट?

Parenting Tips : मुलांच्या शाळा सुरु झाल्या की, पालक कोणता डब्बा आणि बॉटल घ्यावी या प्रश्नात अडकतात? अशावेळी तज्ज्ञ काय सांगतात? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 14, 2024, 02:15 PM IST
स्टील की प्लास्टिक? मुलांना शाळेत नेण्यासाठी कोणता डबा-बॉटल राहील बेस्ट? title=

मुलांच्या शाळा सुरु झाल्या की, नवीन दप्तर, नवीन युनिफॉर्म, नवीन डब्बा आणि बॉटल या गोष्टी मुलांना आकर्षित करतात. या सगळ्या गोष्टींसाठी पालकांची वेगळीच लगबग पाहायला मिळते. हल्ली पालकांचा हेल्दी गोष्टींकडे असलेला कल पाहता, ते मुलांच्या डब्बा आणि बॉटल्सच्या बाबतीतही सतर्क झाले आहेत. पालक आता दोघंही वर्किंग असतात अशावेळी ते सुरुवातीपासूनच मुलांची काळजी घेण्याकडे विशेष भर देतात. 

काही मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत तर काहींच्या शनिवार किंवा थेट मंगळवारपासून होणार आहेत. अशावेळी पालकांची अजूनही डब्बा आणि बॉटलची शोधाशोध सुरु आहे. काही पालक ऑनलाईन खरेदी करतात तर काही पालर अजूनही दुकानांमध्ये जाऊन खरेदी करणं पसंत करतात. 

शाळेच्या डब्बा, बॉटलची खरेदी करताना प्रत्येक पालकांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे प्लास्टिक की स्टील? वर्षानुवर्षे आपण मुलांना प्लास्टिकचे डब्बे देत आलो. पण हे प्लास्टिक मुलांसाठी अतिशय घातक आहे. यावर तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊया. 
अदिती देवधर, जीवित नदी आणि ब्राऊन लीफ, संस्थापक सांगतात की, प्लास्टिक डब्बे आण बॉटल्स या वजनाला हलक्या आणि सहज वापरता येत असल्यातरीही त्या शरीरासाठी घातक आहेत. 

निसर्गासाठी प्लास्टिक हानिकारक आहे. अगदी तसेच ते लहान मुलांसाठी देखील घातक ठरतात. प्लास्टिकमध्ये अनेक रसायने असतात. ज्यामधील कारसिनोजेनिक रसायनांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. काही रसायने इंडोक्रेन डिस्टर्पन्स असतात. 85000 मानवनिर्मित रसायने असतात. जे मुलांच्या आरोग्यासाठी घातक असतात.  

सकाळची शाळा असल्यामुळे अनेकदा मुलांना गरम अन्न डब्यात भरून दिलं जातं. अशावेळी या गरम अन्न पदार्थांचा परिणाम त्या डब्ब्याच्या रसायनावर होतो आणि ते पोटात जाते. प्लास्टिकचं विघटन होत नसलं तरीही त्याचा एक एक तुकडा पोटात जातो. अनेक वर्ष प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण आणि बॉटलमधून पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरते. अदिती देवधर सांगतात की, आठवड्याभरात असे छोटे तुकडे पोटात जाऊन अगदी एटीएम कार्ड एवढा त्याचा आकार तयार होऊ शकतो. 

प्लास्टिक बॉटलमध्ये बुरशी 

अनेक पालकांचा असा अनुभव असेल की, प्लास्टिकची बॉटल असो वा इतर कोणतीही. पण या बॉटलमधील स्ट्रॉला अनेकदा बुरशी लागते. ही काळी बुरशी मुलांच्या आरोग्यासाठी घातक असते. प्लास्टिकची ही स्ट्रॉ स्वच्छ करता देखील येत नाही. त्यामुळे अशावेळी बॉटल बदलणे हा एकच योग्य पर्याय ठरतो. त्यामुळे तीन महिन्याने पाण्याची बाटली बदलणे मुलांसाठी फायदेशीर असते.