प्रेग्नेन्सीमध्ये अंड खावे का? एक्सपर्ट काय सांगतात...

गरोदर महिलांनी गर्भधारणेच्या 9 महिन्यात काय खावे आणि काय खाऊ नये? असे सल्ले दिले जातात. अशावेळी अंड गरोदरपणात खाणे योग्य आहे का? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 24, 2024, 03:48 PM IST
प्रेग्नेन्सीमध्ये अंड खावे का? एक्सपर्ट काय सांगतात... title=

गरोदरपणात महिलांनी सकस आणि पौष्टिक आहार घ्यावा. गरोदरपणात स्त्रीला तिच्या आरोग्याबरोबरच गर्भाच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागते. गरोदरपणात स्त्री जे काही खाते-पिते त्याचा थेट परिणाम तिच्या बाळावर होतो. अंड हे एक सुपरफूड आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याचा उष्ण असा गुणधर्म असतो. अशा परिस्थितीत गरोदर महिलांच्या मनात हा प्रश्न वारंवार येतो की, गरोदरपणात अंडी खावीत की नाही?

काय होतो परिणाम? 

गर्भवती महिला अंडी खाऊ शकतात. अंड्यामध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये व्हिटॅमिन-बी12, व्हिटॅमिन-डी, प्रोटीन, कॅल्शियम, लोह, जस्त, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कोलीन आणि रिबोफ्लेविन यांसारखे अनेक पोषक घटक असतात. जे गर्भवती महिलेला योग्य पोषण देतात. गर्भधारणेदरम्यान महिलांनी अंडी खाताना काही सावधगिरी बाळगली पाहिजे.

अंड खाताना काय काळजी घ्याल? 

गरोदरपणात अंडी खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे परंतु लक्षात ठेवा की, अंडी योग्य प्रकारे शिजवली पाहिजे. कच्च्या आणि कमी शिजलेल्या अंड्यांमध्ये साल्मोनेलासारखे हानिकारक जीवाणू असतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. शिजवलेल्या अंड्यांमुळे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात, त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचण्याचा धोका नसतो. तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही उकडलेले अंडे किंवा अंड्याचे ऑम्लेट खाऊ शकता. कच्ची किंवा कमी शिजलेली अंडी खाऊ नयेत. याशिवाय दिवसातून फक्त एक ते दोन अंडी खावीत. जर तुम्हाला अंड्याची ॲलर्जी असेल तर चुकूनही त्याचे सेवन करू नका.

सकाळी करा अंड्यांचे सेवन 

गर्भवस्थेत असताना सकाळच्या नाश्तामध्ये अंड्याचे सेवन करावे. कारण या दरम्यान मेटाबॉलिज्म चांगले राहते. सकाळी अंडे खाल्ल्याने पचनाची समस्या सुधारते. शरीराला चांगला फायदा होतो.

गरोदरपणात कोणत्या प्रकारची अंडी खावीत?

गरोदरपणात अंडी खाण्यापूर्वी नीट शिजवून घ्या. लक्षात ठेवा अंड्याचा पिवळा भाग बाहेर पडू नये. अंड पूर्ण शिजण्यासाठी 10 ते 12 मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच फ्राय अंड्याचे देखील सेवन करु शकता. अंड्याचा पोळा केल्यावर तो 2 ते 3 मिनिटे दोन्ही बाजूने शिजवा. 

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)