Mumbai News Today: फोडणीसाठी किंवा खडे मसाले यासाठी जिरे वापरण्यात येते. जिरे हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे. पण तुम्ही जे जिरे वापराताहेत हे खरं आहे का? मुंबई व लगतच्या परिसरात विक्री करण्यात येणारे जिरे हे बनावट असल्याचे समोर आले आहे. भिवंडी येथील शांतिनगर पोलिसांनी हॉटेल व कॅटरर्स यांना पुरवण्यात येणाऱ्या बनावट जिऱ्याच्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. तर त्यांच्याकडून 7.19 लाख रुपयांच्या किंमतीचे लाकडाच्या भूसापासून बनवलेले सात टन जीरे जप्त करण्यात आले आहे. आरोपींकडून चार लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप टेम्पो, पालघर येथील कारखान्यातून 30 लाख रुपये किमतीची मशिन आणि कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना टेम्पोमध्ये 80 गोण्यांमध्ये भरलेले 2399 किलो वजनाचे बनावट जीरे जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे आणि पोलीस शिपाई क्षीरसागर यांना गुप्त माहिती मिळाली होती. दोन व्यक्ती लाखो रुपयांचे बनावट जीरे विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत नागाव येथील फातिमा नगर येथे एका टेम्पोला अडवले. टेम्पोची चौकशी केल्यानंतर खाद्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी बनावट जीरे जप्त केले आहेत.
लाकडाच्या भूशावर विविध रासायनिक प्रक्रिया करुन लेप लावण्यात आला आहे. जेव्हा हे जीरे पाण्यात टाकण्यात आले तेव्हा ते त्यात विरघळले तसंच पाणी पण काळं झालं. जिरे बनावट असल्याची खात्री पटल्यानंतर टेम्पो चालक शादाब खान आणि चेतन रमेशभाई गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चेतन गांधी यांची पालघर येथील नंडोरे येथील नोवेल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जागृती एंटरप्राइजेसमध्ये बनावट जिरे बनवण्याची फॅक्ट्री सुरू केली होती. त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत लायसन्स नसून हे बनावट जिरे प्ररोट ब्रँड नावाने विक्री केले जात होते. बडिशोपच्या आकाराचा कच्चा माल आणून त्याला रंग देऊन खऱ्या जिऱ्यामध्ये मिसळून त्याची विक्री करण्यात येत होती. एपीएमसी मार्केटसोबतच ठाणे, पालघर, मुंबई आणि गुजरात या क्षेत्रातील हॉटेल आणि कॅटरर्सना घावूक किंमतीत ते विक्री करत होते. पोलिसांनी या फॅक्टरीला टाळे टोकले आहे.
बनावट जिरे पाण्यात टाकल्यावर ते मळकट रंगाचे दिसते आणि पाणीही गढूळ होते. या व्यतिरिक्त असली जिरे पाण्यात टाकल्यानंतर पाणी स्वच्छ आणि पिवळसर रंगाचे दिसते. या पद्धतीने तुम्ही बनावट जिरे ओळखू शकता.