फक्त महाराष्ट्रातच बनवला जातो 'हा' पदार्थ, विदर्भाची शान असलेली ही रेसिपी करुन पाहाच

Vidarbha Special Recipe: विदर्भातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे गोळा भात, आज गोळा भाताची रेसिपी जाणून घेऊया.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 30, 2024, 06:33 PM IST
फक्त महाराष्ट्रातच बनवला जातो 'हा' पदार्थ, विदर्भाची शान असलेली ही रेसिपी करुन पाहाच title=
maharashtra day vidarbha special Nagpuri Gola Bhaat recipe in marathi

Vidarbha Special Recipe: महाराष्ट्र हा वैविधतेने नटलेला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील संस्कृती, भाषा, खाद्यपदार्थ वेगवेगळ्या आहेत. त्या-त्या प्रदेशाची खासियात ही त्या संस्कृती व पदार्थांवरुन ठरते. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाची भाषाही वेगळी आहे. कोकणी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर या प्रदेशाची भाषाही वेग-वेगळी आहे. असं म्हणतात की मराठी भाषा ही दर 12 कोसांवर बदलते. मराठी भाषा दर प्रांतात वेगळ्या लहेजात बोलली जाते. महाराष्ट्राची उपराजधानी विदर्भात आहे. विदर्भानेही आपली वेगळी संस्कृती जोपासली आहे. 

विदर्भ म्हटलं की रखरखत उन आणि अवकाळी पाऊस हेच डोळ्यासमोर येतं. मात्र, विदर्भाची खाद्य संस्कृतीदेखील समृद्ध आहे. विदर्भाचे सावजी चिकन, खापरावरची पुरणपोळी हे तर पदार्थ तुम्हाला माहिती असतील. पण विदर्भाची एक खासियत म्हणजे गोळा भात. गोळा भात हा अस्सल वऱ्हाडी भात म्हणून लोकप्रिय आहे. गोळा भात, भाजा भात, वांगा भात, भरडा भात असे भाताचे अनेक पदार्थ आहेत. आज आपण अस्सल वैदर्भीय गोळा भात कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया. 

गोळा भातासाठी साहित्य

बासमती किंवा दुसरा एखाद्या जातीचा तांदुळ, तांदळाच्या दुप्पट गरम पाणी, 1/2 टीस्पून मीठ, 1/2 जिरे, 2 टेबलस्पून तेल 

गोळ्यासाठी साहित्य

बेसन, 1/2 टीस्पून ओवा, 1 टीस्पून धणेपूड, जिरेपूड, हळद, 1/2 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून साखर, मीठ चवीप्रमाणे, तेलाचे मोहन, पाणी.

भाताच्या फोडणीसाठी

तेल, सुक्या मिरच्या, मोहरी, हिंग, 

कृती

सगळ्यात आधी एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यात मीठ, साखर, ओवा, धणे, जिरेपूड, हळद आणि तिखट घालून एकत्र करा. त्यानंतर त्यात मोहन घालून मिक्स करा. आता यात पाणी घालून मिश्रण कालवून घ्या. मिश्रण जास्त पातळ करु नका. या मिश्रणाचे गोळे होतील या प्रमाणे कालवून घ्या. मध्यम आकाराचे गोळे करुन घ्या. एकीकडे गोळे करुन ठेवल्यानंतर दुसरीकडे भाताची तयारी करुन घ्या. 

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा दही घाला त्यानंतर थोडे तेल टाकून भिजवून घेतलेला भात टाकून अर्ध्यापर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर या भातात आधी केलेले गोळे टाकून घ्या. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून भात आणि गोळे पूर्णपणे शिजवून घ्या. त्यानंतर कडीपत्ता, जिरे मोहरी आणि कोथिंबीर घालून तयार केलेली फोडणी त्यावर घाला. आता हे सर्व मिश्रण एकत्र करुन घ्या. तुम्ही गोळा भात फोडणीच्या कढिसोबत किंवा चिंचेच्या कढीसोबत खावू शकता.