Job News : स्त्री - पुरुष समानतेचा मुद्दा चर्चेत असतानाच महिला आणि पुरुषांच्या वाट्याला येणारी कामं, त्यांची दिनचर्या आणि इतर अनेक गोष्टींमध्ये मात्र मोठी तफावत आढळते. काळ कितीही पुढे गेला तरीही काही गोष्टी मात्र बदलताना दिसत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे दैनंदिन जीवनात महिलांच्या वाट्याला येणारा संघर्ष. घरातील दैनंदिन कामं, मुलाबाळांची काळजी, त्यांचं शिक्षण आणि हे सर्व सांभाळतानाच स्वत:चं अस्तित्वं अबाधित ठेवत केली जाणारी नोकरी अशी तारेवरची कसरत दर दिवशी महिलांना करावी लागते.
कुटुंब, करिअर, जबाबदाऱ्या या आणि अशा अनेक वाटांमध्ये ताळमेळ साधत महिलांना एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात. या साऱ्यामध्ये महिलांचं मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाची भूमिका बजावतं. एकिकडे हा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे कुटुंबाकडून मिळणारी साथ आणि आधारही तितक्याच महत्त्वाच्या भूमिकेत असतो. पण, अनेकदा या गोष्टींची समीकरणं बदलतात आणि समतोल बिघडून अनेक महिलांना हातची नोकरी सोडण्याचं पाऊल उचलावं लागतं.
Naukri.com नं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका निरीक्षणपर अहवालानुसार सततच्या वाढत्या जबाबदारीमुळं जवळपास 39 टक्के महिलांना नोकरी सोडावी लागली होती. नोकरीच्या वेळेमध्ये Flexibility दिल्यास बऱ्याच महिला पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यासाठी तयार असल्याचंही या अहवालातून स्पष्ट झालं. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर झालेल्या या निरीक्षणामध्ये नोकरीच्या ठिकाणी महिलांना पुरुषांप्रमाणे समान संधी असतात या मताशी फक्त 3 टक्के महिलांनी सहमती दर्शवली. तर, पाहणीत सहभागी झालेल्या 13 टक्के पुरुषांच्या मते नोकरीच्या ठिकाणी महिलांना पुरुषांप्रमाणेच समान संधी मिळते.