1 ग्रॅम मध बनवण्यासाठी 195 किमीपर्यंत प्रवास करतात मधमाशा; जाणून घ्या अशा रंजक गोष्टी

Facts about Honey Bees: एक मधमाशी ताशी 25 किलोमीटर वेगाने उडू शकते. ती एका सेकंदात 200 वेळा पंख फडफडवते. मधमाशांच्या वासाची जाणीव माणसांपेक्षा जास्त असते. एक मधमाशी तिच्या संपूर्ण आयुष्यात एक चमचे मधाचा फक्त 12वा भाग बनवू शकते.  

शिवराज यादव | Updated: Jun 5, 2024, 09:27 PM IST
1 ग्रॅम मध बनवण्यासाठी 195 किमीपर्यंत प्रवास करतात मधमाशा; जाणून घ्या अशा रंजक गोष्टी title=

Facts about Honey Bees: पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या मधमाशा लाखो वर्षांपासून मध बनवत आहेत. मधमाशांनी बनवलेल्या मधाचे अनेक फायदे आहेत. मधामध्ये अनेक प्रकारचे पोषक, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मधाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म देखील असतात, जे अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. माणसाला ही अनोखी देणगी देणाऱ्या मधमाशा आपलं संपूर्ण आयुष्य एक चमचा मध बनवण्यात घालवतात. मधमाशांशी संबंधित अशाच काही आश्चर्यकारक आणि रंजक गोष्टी जाणून घ्या ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. 

1) मधमाशा लाखो वर्षांपासून पृथ्वीवर वास्तव्यास असून मध बनवतात.
2) पृथ्वीवर मधमाशांच्या 20 हजारांहून अधिक प्रजाती आहेत, त्यापैकी फक्त 5 प्रजाती मध तयार करतात.
3) एका पोळ्यात 50 हजार मधमाशा असू शकतात. त्यांचे पोळे मेणाचे बनलेले असते, जे त्यांच्या पोटातील ग्रंथींमधून बाहेर येते.
4) पोळ्यात फक्त तीन प्रकारच्या मधमाशा राहतात. पोळ्यामध्ये हजारो मादी मधमाशा राहतात. याशिवाय शेकडो नर मधमाश्या (ड्रोन) आणि फक्त एक राणी मधमाशी आहे.
5) पोळ्यात राहणाऱ्या मादी मधमाशांना कामगार म्हणतात. कारण या मधमाशाच मध बनवण्याचं काम करतात. नर मधमाशा तिथे फक्त राणी मधमाशीसोबत सोबतीला असतात.
6) तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पोळ्यामध्ये राहणारे शेकडो नर राणीला गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यापैकी फक्त एकच या कार्यात यशस्वी होतो.
7) पोळ्यात राहणारी फक्त राणी मधमाशीच अंडी घालते. ती एका दिवसात 2000 पेक्षा जास्त अंडी घालते. उन्हाळ्याच्या प्रजनन हंगामात ही संख्या 2500 पर्यंत पोहोचू शकते.
8) मधमाशीचे आयुष्य जास्तीत जास्त एक महिन्याचे असते. परंतु मधमाशांची राणी अनेक वर्षे जगू शकते. तिचं वजन आणि आकार इतर मधमाशींपेक्षा मोठा असतो.
9) मधमाशी ताशी 25 किलोमीटर वेगाने उडू शकते. ते एका सेकंदात 200 वेळा पंख फडफडवते.
10) मधमाशांच्या वासाची जाणीव माणसांपेक्षा जास्त असते. एक मधमाशी तिच्या संपूर्ण आयुष्यात एक चमचे मधाचा फक्त 12वा भाग बनवू शकते.
11) एक पौंड (454 ग्रॅम) मध तयार करण्यासाठी मधमाशांना 55 हजार मैल (88514 किलोमीटर) अंतर कापावे लागते. जे आपण काही आठवड्यांत खाऊन टाकतो.