Gokulashtami Special Kala Vatana Sambar: येत्या काही दिवसांतच जन्माष्टमीचा सोहळा सुरू होणार आहे. गोकुळाष्टमीला कोकणातील अनेक घरांत काळ्या वाटाण्याचा सांबार आणि आंबोळीचा घाट घातला जातो. कोकणात काळ्या वाटाण्याचे कालवण नेहमी केले जाते. त्यासाठी विशेष पद्धत वापरली जाते. अनेकदा काळ्या वाटाण्याचे सांबार, आमटी किंवा कालवण असंही म्हटलं जाते. आज आपण आंबोळी व काळ्या वाटाण्याचा सांबार कसा करायचा. याची रेसिपी आणि काही टिप्स लक्षात घ्या.
काळे वाटाणे, बारीक चिरलेला कांदा, धणेपूड, जिरेपूड, आमसुलं, गूळ, काळा मसाला, मीठ, कांदा-खोबऱ्याचे वाटण
कांदा खोबऱ्याचे वाटणासाठी साहित्य- खोवलेला नारळ, कांदा, तेल.
ज्या दिवशी सांबार करायचा आहे तर त्याच्या आदल्यादिवशी काळे वाटाणे भिजवून ठेवा. 8 ते 10 तास काळे वाटाणे भिजवले पाहिजेत. नंतर पाणी काढून टाकावे. त्यानंतर काळे वाटाणे कुकरला लावून चांगले मउसूत शिजवून घ्यावे. त्यातील थोडेसे वाटाणे बाजूला काढून ठेवा.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे नंतर कांदा नीट परतून घ्यावा. कांदा शिजल्यानंतर त्यात ओला नारळ टाकून पुन्हा परतून घ्यावे. हे मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्या व वाटण करुन घ्या. त्यानंतर त्याच मिक्सरमध्ये बाजूला काढलेले उकडलेले वाटाणे वाटून घ्या. चांगली पेस्ट करुन घ्या.
आता एका भांड्यात तेल गरम करुन घ्या. त्यात जिरे, मोहरी आणि कढिपत्ताची फोडणी द्या. त्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर त्यात कांदा टाकून चांगला परतवून घ्या. कांदा गुलाबीसर झाल्यानंतर त्यात मसाला आणि कांदा-खोबऱ्याचे वाटण टाका. चांगलं परतवून घेतल्यानंतर वाटलेली काळ्या वाटाण्याची पेस्ट त्यात टाकून चांगलं परतवून घ्या.
मसाले चांगले एकत्र करुन घेतल्यानंतर त्यात वाटाणे टाकून एकजीव करा. आता त्यात उकडलेल्या वटाण्याचे पाणी टाकून थोडा दाटसर रस्सा करा. एक त्यानंतर वरुन चवीपुरतं मीठ टाकून एक चांगली उकळी घ्या. सांबार उकळून घेतल्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर टाका आणि पु्न्हा एक उकळी घ्या. मालवणी पद्धतीचा काळा वाटाळा सांबार तयार आहे.
घरच्या घरी आंबोळी व घावणे बनवणे खूप सोप्पं आहे.
आंबोळी करण्यासाठी डोश्याप्रमाणे पीठ तयार करुन ते आंबवून घेतले जाते. कोकण स्पेशल आंबोळीची पाककृती जाणून घेऊया.
तांदुळ, पांढरी उडीद डाळ, पोहे, मेथी दाणे, तेल, मीठ
3 कप तांदुळ, 1 कप उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे स्वच्छ धुवून 6 ते 7 तास भिजत ठेवा. त्यानंतर अर्धा कप भिजवलेले पोहे घालून मिश्रण वाटून घ्या. मिश्रण वाटून झाल्यानंतर एका एअर टाइट डब्यात भरुन रात्रभर ठेवून द्यावे.
सकाळी मिश्रण वर आलेले दिसेल. आता ते चांगले एकजीव करुन त्यात चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी घालावे व पुन्हा एकजीव करा. आता गरम तव्यावर चमचाभर पीठ पसरवून डोशापसारखे काढून घ्या. 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्या. पुन्हा आंबोळी परतून 2 मिनिटे शिजवून घ्या. काळ्या वाटाण्याची उसळीबरोबर गरमा गरम आंबोळीचा आस्वाद घ्या.