अर्णब गोस्वामींची याचिका हायकोर्टाने फेटाळली

मराठी माणसांनी आमच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन अक्षता नाईक यांनी केलंय.

Updated: Nov 9, 2020, 05:05 PM IST
अर्णब गोस्वामींची याचिका हायकोर्टाने फेटाळली  title=

अलिबाग : रिपब्लिक टीव्ही ( Republic TV) चे संपादक अर्णब गोस्वामी यांची अंतरिम जामिनाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अंतरिम जामिनासाठी गोस्वामी यांना खालच्या कोर्टात जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

जामिनासाठी आधी मजिस्ट्रेट कोर्ट नंतर सत्र न्यायालयामध्ये अर्ज करायचा असतो. जामिन न मिळाल्यास उच्च न्यायालयात अर्ज दिला जातो. याप्रकरणी कोणती वेगळी व्यवस्था नाहीय. 

नितीश आणि प्रवीण यांनाही दिलासा नाही

यासोबतच सह आरोपी असलेल्या नितीश सारडा आणि प्रवीण राजेश सिंह यांचा अंतरिम जामिन अर्ज फेटाळून लावण्यात आलाय. अर्जदार सत्र न्यायालयाचे दार ठोठावू शकतात. संबंधित न्यायालयामध्ये ४ दिवसांच्या अवधीत अर्जावर निर्णय होईल. 

सत्याचा विजय होतो

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अक्षता नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. सत्य आपोआप बाहेर येतं. सत्याचा विजय होतो असे त्या म्हणाल्या. सत्यासाठी उभे रहा. मराठी माणसांनी आमच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन अक्षता नाईक यांनी केलंय. अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक सत्र न्यायालयात उपस्थीत आहेत. अन्वय नाईक कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय.