नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर आता सर्वांना २३ मे रोजीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. याचाच फायदा उठवत zomato या ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपने zomato election league ही हटके ऑफर लाँच केली आहे. त्यानुसार २३ मेच्या आधी देशाच्या नव्या पंतप्रधानांचे अचूक नाव सांगणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. तसेच ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर ४० टक्के डिस्काऊंट मिळेल. याशिवाय, पंतप्रधानपदाचा अंदाज अचूक ठरल्यास ३० टक्के कॅशबॅकही ग्राहकांच्या खात्यात जमा होईल. २२ तारखेपर्यंत ग्राहकांना या ऑफरचा लाभ उठवता येईल.
देशाच्या नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर लगेचच हे पैसे ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा केले जातील. आतापर्यंत zomato election league मध्ये २५० शहरांमधील ३ लाख २० हजार लोकांनी सहभाग घेतला आहे.
यापूर्वी झोमॅटोने आयपीएल स्पर्धेच्यावेळी झोमॅटो प्रीमिअर लीग ही ऑफर सुरु केली होती. या ऑफर अंतर्गत आयपीएल स्पर्धेच्या विजेत्याचे अचूक नाव सांगणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक मिळाली होती.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर रविवारी प्रसारमाध्यमे आणि विविध संस्थांकडून मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल जाहीर करण्यात आले होते. यापैकी बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येईल, असे भाकीत वर्तवले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे.