खूशखबर! नववर्षात होम लोनचा हफ्ता कमी होण्याची शक्यता

काही दिवसांपूर्वी झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात बॅंकेकडून कोणतीही कपात करण्यात आली नव्हती.

Updated: Dec 26, 2018, 04:18 PM IST
खूशखबर! नववर्षात होम लोनचा हफ्ता कमी होण्याची शक्यता title=

मुंबई - होमलोन अर्थात गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्या नागरिकांसाठी नवीन वर्षात खूशखबर मिळू शकते. कारण गेल्या काही महिन्यांपासून अपेक्षित असलेला रेपो दर कमी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या आढावा बैठकीत घेऊ शकते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात बॅंकेकडून कोणतीही कपात करण्यात आली नव्हती. रेपो दर ६.५ टक्क्यांवर जैसे थे ठेवण्यात आला होता. त्यामुळे बॅंकांकडून कर्जाच्या व्याजदरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. पण गेल्यावेळी झालेल्या आढावा बैठकीवेळी पुढील वर्षात नागरिकांचे हफ्ते कमी होऊ शकतात. असे रिझर्व्ह बॅंकेने आधीच सूचित केले होते. 

महागाईचा निर्देशांक पर्याप्त पातळीवर राहिला तर पुढील पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर कमी केला जाऊ शकतो, असे रिझर्व्ह बॅंकेचे तत्कालिन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटले होते. पण त्यानंतर उर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदावरून राजीनामा दिला आहे. आता शक्तिकांत दास यांच्याकडे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नरपद आहे. गेल्या काही महिन्यांपासून महागाई निर्देशांकांत मोठी वाढ झालेली नाही. त्यामुळे पतधोरण आढाव्यात रेपो दर कमी करण्याची संधी बॅंकेला मिळाली आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई निर्देशांक २.७ ते ३.२ राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनीही रेपो दरात कपात करण्याची वेळ आली असल्याचे सूचित केले आहे. अर्थात रिझर्व्ह बॅंकेची पतधोरण आढावा समिती काय निर्णय घेईल, हे आपण सांगू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.