नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने यंदाचा स्वातंत्र्यदिन खास पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं आहे.
यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकावणं अनिवार्य केलं आहे. त्यासोबतच राष्ट्रगीत गाणंही अनिवार्य केलं आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त अशा प्रकारचे निर्देश पहिल्यांदाच दिले गेले आहेत. उत्तर प्रदेश सरकारतर्फे देण्यात आलेल्या आदेशात म्हटलं आहे की, शहीदांना श्रद्धांजली देण्यात यावी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात यावं. यासंदर्भात उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेने ३ ऑगस्ट रोजी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिका-यांना ही पत्रं पाठवले आहेत.
मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचं स्वरुप या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
मदरसा परिषदेने पाठविलेल्या पत्रांत म्हटलं आहे की, १५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करणअयात यावं. सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करावी. तसेच या कार्यक्रमाचं व्हिडीओ शूटिंग आणि फोटोही काढण्याचे निर्देश दिले आहेत.