मुंबई : बिहारमधील पाटणा येथे रविवारी मोठा विमान अपघात टळला. टेक-ऑफ दरम्यान, पक्षी विमानाच्या इंजिनला धडकला आणि आग लागली. काही वेळ हवेत राहिल्यानंतर विमानाने एकाच इंजिनच्या सहाय्याने इमर्जन्सी लँडिंग (emergency landing) केले. ज्या स्पाईसजेट विमानाला (SpiceJet Flight) हा अपघात झाला त्या विमानाची कॅप्टन होती मोनिका खन्ना. मोनिका (Monica Khanna) हे विमान उडवत होत्या हे फार कमी लोकांना माहीत आहे. आता कॅप्टन मोनिका खन्ना यांचे देशभरातून कौतुक केले जात आहे.
एका इंजिनवर विमान सुरक्षितपणे उतरवल्याने विमानातील 185 प्रवाशांसह 191 लोकांचे प्राण वाचले. कॅप्टन मोनिका खन्ना, पायलट-इन-कमांड (पीआयसी), फ्लाइट एसजी 723, यांनी आग लागल्याचे लक्षात येताच प्रभावित इंजिन बंद केले आणि मोठी दुर्घटना टळली. स्पाईसजेटने कॅप्टन मोनिका खन्ना यांचेही कौतुक केले.
स्पाईसजेटने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'कॅप्टन मोनिका खन्ना आणि फर्स्ट ऑफिसर बलप्रीत सिंग भाटिया यांनी या घटनेदरम्यान हुशारीने काम केले. विमान चांगल्या प्रकारे हाताळले. ते अनुभवी अधिकारी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे.'
स्पाईसजेट विमानाच्या एसजी-723 च्या इंजिनला रविवारी पाटणा ते दिल्लीला उड्डाण करताना आग लागली. त्यामुळे विमानातून मोठा आवाजही येत होता. याबाबत स्थानिकांनी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाला माहिती दिली. विमानातील ज्वाळा एटीसी टॉवरमध्ये बसलेल्या तंत्रज्ञांच्याही लक्षात आल्या आणि त्यांनी तात्काळ वैमानिकाला माहिती दिली आणि विमान पाटणा विमानतळावर उतरण्यास सांगितले.
वैमानिकांनी दुसऱ्या इंजिनच्या मदतीने विमान पाटणा विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. विमानात 183 प्रौढ आणि दोन मुले होते. क्रूमध्ये चार सदस्य होते. पायलट आणि सहाय्यक पायलट यांच्या हुशारीमुळे एकही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही. पाच तासांनंतर त्यांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले.