Monsoon Update: एसी-कूलर झाले बंद, पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाल्याने दिलासा

देशात अनेक ठिकाणी पावसाने धडक दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Updated: Jun 20, 2022, 02:22 PM IST
Monsoon Update: एसी-कूलर झाले बंद, पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाल्याने दिलासा title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेच असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून दाखल झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या 2 ते 3 दिवसांत संपूर्ण उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात पाऊस सुरु होणार आहे. 

हवामान खात्याच्या अहवालानुसार आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. 19 ते 23 जून दरम्यान देशभरात पावसाळा सुरु होणार आहे.

मुंबई, ठाण्यासह कोकणात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र, काही ठिकाणीच तुरळक पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. 

राज्यभरात पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण कोकण विभागासह मुंबई, ठाणे परिसरात काही भागांत जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

महाराष्ट्र, गोवानंतर बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेशात पावसाला सुरुवात झाली आहे. बिहारमध्ये मान्सूनचे आगमन होताच अनेक राज्यांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या संततधारमुळे वातावरण थंड झाले आहे. झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरातून तयार झालेल्या ट्रफ लाइनचा परिणाम पश्चिम बंगालमध्येही दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश, लडाखमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागात पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे.

आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. संततधार पावसामुळे भूस्खलनाच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. लोकांची घरे, रस्ते सर्वच पाण्यात बुडाले आहेत. सरकारकडून शिबिरे उभारण्यात आली असून लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे.