प्रवीण तोगडियांना का सोडावी लागली विश्व हिंदू परिषद

हिंदुत्‍वाचा आवाज असलेले विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांना सोडावी लागली विश्व हिंदू परिषद

शैलेश मुसळे | Updated: Apr 15, 2018, 04:17 PM IST
प्रवीण तोगडियांना का सोडावी लागली विश्व हिंदू परिषद title=

मुंबई : राम मंदिर आंदोलन आणि ९० व्या दशकातील हिंदुत्‍वाचा आवाज असलेले विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी शनिवारी संघटना सोडण्याची घोषणा केली. ३० वर्षाहून अधिक वेळ ते या संघटनेसोबत होते. प्रवीण तोगडिया यांचे समर्थक अध्‍यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांनी संघटना सोडण्याचा निर्णय घेतला. विहिपचा अध्‍यक्ष हाच आंतरराष्‍ट्रीय कार्यकारी अध्‍यक्ष देखील निवडतो. आतापर्यंत तोगडिया हेच अध्यक्ष होते. पण त्यांचे समर्थक राघव रेड्डी यांच्या पराभवानंतर आता स्‍पष्‍ट झालं होतं की, आता तोगडिया यांना देखील हटवलं जाऊ शकतं.

विहिप हा संघाचाच एक भाग मानला जातो. तोगडिया यांच्या विरोधात संघाचं समर्थन देखील होतं. कारण संघ त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी नव्हता. सूत्रांच्या माहितीनुसार, संघाला ही गोष्ट खटकत होती की, विहिपच्या पदावर असतांना तोगडिया मोदी सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत होते. तोगडिया हे भाजपवर हिंदुत्‍वाच्या मुद्दायवर नरमीची भूमिका घेतल्याचा आरोप करत होते. तोगडिया यांनी आरोप केला की, बहुमत मिळाल्यानंतर ही अयोध्येमध्ये राम मंदिर बनवण्याचा कायदा सरकार विसरली. 1989 मध्ये पालमपूरमध्ये भाजपने हा प्रस्ताव ठेवला होता. विकासही नाही झाला आणि राम मंदिर ही नाही झालं. सरकार अपयशी ठरल्याची टीका ते भाजपवर करत होते.
 
२०१९ निवडणुकीत तोगडिया यांचा विरोध बाजुला करण्यासाठी संघ आणि सरकारने त्यांना विहिपच्या पदावरुन बाजुला केलं. असं बोललं जात आहे. 

प्रवीण तोगडिया आणि नरेंद्र मोदी

दोन्ही नेते गुजरातमधून येतात. १९७२ पासून मोदी आणि त्यांच्यात मैत्री असल्याचं एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं. एकेकाळी दोघे नेते एकाच स्कूटरवर फिरत होते. १९८३ मध्ये तोगडिया यांना विहिपमध्ये तर मोदी यांना भाजपमध्ये पाठवण्यात आलं. २००१ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले. त्या दरम्यान दोघांचे संबंध चांगले होते. पण नंतर त्यांचं संबंध बिघडले. मोदींना विरोध तोगडिया यांना भारी पडला आणि म्हणून विहिपमधून त्यांना हटवलं गेल्याची चर्चा आहे.