मुंबई : २०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते की जेव्हा परदेशातून काळा पैसा परत आणला जाईल तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आश्वासनावर मोहन कुमार शर्मा यांनी पीएमओला सवाल केला की कधी माझ्या खात्यात १५ लाख रुपये जमा हणार. याला नुकतेच पीएमओकडून उत्तर देण्यात आले. पीएमओच्या माहितीनुसार हा प्रश्न आरटीआय कायद्यांतर्गत विचारला जाऊ शकत नाही. त्यामुळे याचे उत्तर देता येणार नाही.
मोहन कुमार शर्मा यांनी २६ नोव्हेंबर २०१६मध्ये अर्ज दाखल करताना १५ लाख रुपये कधी जमा होणार याचे उत्तर मागितले होत. हा अर्ज एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्दबातल करण्याच्या निर्णयानंतर दाखल केला होता. मोदींनी दिलेल्या आश्वासनानुसार कोणत्या तारखेला १५ लाख रुपये जमा होणार याची माहितीही त्यांनी मागवली होती.
सुनावणीदरम्यान शर्मा यांनी मुख्य सूचना आयुक्त आर के माथूर यांच्यासमोर तक्रार केली की त्यांना पीएमओ आणि रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
माथूर याबाबत म्हणाले, पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार अर्जदाराने प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये कधी जमा होणार असे प्रश्न केला होता. ही माहिती आरटीआयच्या कलम २ एफ अंतर्गत विचारली जाऊ शकत नाही.